मुक्तपीठ
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आता एनआयए ऍक्शन मोडमध्ये आली आहे. रात्री १०.३०च्या सुमारास एनआयएची टीम, फॉरेंसिक टीमसह सचिन वाझेंसोबत स्फोटकं सापडलेल्या स्पॉटवर पोहोचली. यावर त्या दिवसाच्या घटनेचं नाट्यरुपांतर करण्यात आलं. ‘त्या’ दिवशी स्कॉर्पिओ गाडीतून पीपीई किट घालून उतरलेला व्यक्ती हा सचिन वाझेच असल्याचा एनआयएला संशय आहे. त्यामुळेच त्यादिवशी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधल्या त्या व्यक्तीच्या हालचालींना समोर ठेवून सचिन वाझेंना त्याच स्पॉटवर उभं करण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमधल्या त्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि वाझेंची चालण्याची पद्धत तापसण्यात आली आहे. सुरुवातीला सचिन वाझेंना स्पॉटवरुन चालण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या व्यक्तीने घातलेला पीपीई कीट, डोक्यावर बांधलेला रुमाल, कुर्ता हा सचिन वाझेंना घालण्यात आला. वाझेंसोबत त्या रात्रीचं नाट्यरुपांतर करण्यात आलं आहे. दरम्यान, सचिन वाझेंच्या अंतरीम जामीनावरची सुनावणी ३० मार्चला होणार आहे.