मुक्तपीठ टीम
राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
सामाजिक अंतर राखणे सोईस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.