मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ज्या तृणमूल कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे, आता त्याच पक्षातील दीडशे नेत्यांना निवडणुक लढवण्यासाठी तिकीट दिली आहे. आतापर्यंत भाजपने एकूण २८९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील जवळपास निम्म्या लोकांनी ममता बॅनर्जीना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ८ मुस्लिम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. तसेच दोन उमेदवार तर असेही आहेत, जे दुसऱ्या पक्षात असूनही न मागताच तिकीट दिले. त्यांनी भाजपाची उमेदवारी जाहीररीत्या झिडकारली.
अनेक उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप
- भाजप बंगालमधील भ्रष्टाचार संपवण्याविषयी बोलत आहे. दुसरीकडे, त्यांनी ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यापैकी बर्याच जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.
- भाजपचे नेते मात्र हा प्रश्न कोणावरही आरोप सिद्ध झालेला नसल्याचे सांगत फेटाळून लावतात. सध्या चौकशी सुरू आहे.
- आतापर्यंत पक्षाने २८९ नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी तब्बल दीडशे असे उमेदवार आहेत, ज्यांनी तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्यापैकी बर्याच जणांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाची यादी पाहिल्यावर असे वाटते की त्यांना अद्याप बंगालचे राजकारण समजलेले नाही, अशी टीका होऊ लागली आहे.
पक्षात नसलेल्या दोघांना उमेदवारी, त्यांनी झिडकारलं!
- गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या १५७ उमेदवारांपैकी २ उमेदवारांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला नाही किंवा तिकिटाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
- पहिले नाव तरुण साहाचे आहे. तरुण यांची पत्नी माला साहा तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार आहेत. भाजपाने त्यांना काशीपूर-बेलगाछिया येथून उमेदवार केले.
- या यादीमध्ये भाजपने माझे नाव कसे जाहीर केले ते माहित नाही. मी काल रात्रीपर्यंत तृणमूल कॉंग्रेसचा झेंडा लावण्याचे काम केले आहे. मी पक्षाला कळविले आहे की, भाजपने अनावश्यकपणे या नावाचा समावेश केला आहे. मी तिथल्या कोणाशीही बोललो नाही, असे त्यांनी सांगितले.
- त्याचप्रमाणे पक्षाने उत्तर कोलकाताच्या चौरंगी येथून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली आहे. परंतु मी भाजपमध्ये सामील झालेली नाही असे बोलत त्यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिला आहे.
- अनेक वर्षांपासून भाजपासाठी काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष केले आणि तृणमूलच्या बंडखोरा नेत्यांना तिकीट दिले, त्यामुळे भाजपासाठी खस्ता खाणारे निष्ठावान नाराज झाले आहेत.