आजच एक पोस्ट वाचली.
” मी केशकर्तनकार नसूनही मी हे काम लॉकडाऊनमध्ये शिकून घेतलं आहे. गेल्या २वर्षात आपण २७००,२८०० लोकांना ही सेवा दिली आहे. हे एकट्याचं काम नसून तुमचा सहकार्याची गरज आहे. मी सर्व काम शिकवेन. जो कोणी इच्छूक असेल त्यांनी माझाशी संपर्क करा. 🙏आणि ग्रुप मधील जे कोणी डॉक्टर असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की जर कोणत्या व्यक्तीचा डोक्यामध्ये जखमा किंवा खवले होत असेल तर मला प्रथम उपचार कसे करता येईल याचे मार्गदर्शन करावे.“
अनाथाश्रम, वृद्धाश्रम वगैरे आश्रमांमध्ये जाऊन समाजसेवा करणारे अनेक आहेत. नाभिक समाजातील नसूनही केशकर्तनकला शिकणारेही हजारो असतील. आता करिअरचा एक चांगला पर्याय झाला आहे. पण या पोस्टमधून मला दिसलं एक वेगळंपण. समाजसेवेसाठी सहकार्याचा वेगळा मार्ग शोधण्याची धडपड. मी निकेशशी बोललो.
निकेत सखाराम व्यवहारे. २७ वर्षांचा तरुण. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डात नोकरी करतो. तिथं आठ तास नोकरी करुन उरलेल्या वेळेत समाजासाठी धडपड. वडिलांना समाजसेवेची आवड आहे. सखाराम बापू व्यवहारे त्यांचं नाव. किराणा मालाचे दुकान आहे. त्यातून वेळ काढून ते समाजसेवा करत असतात. निकेत ते लहानपणापासून पाहत आला. तेव्हापासून तो अनाथ, दिव्यांग, दृष्टीहिनांच्या निवारा केंद्रात जात असे.
त्याचा मूळ राजस्थानमधील मित्र सुनील सैनी यांचं उल्हासनगरात सलून आहे. आदल्या दिवशी निकेत म्हसकळच्या पारस बालाश्रमात गेला होता. तिथं मुलांचे केस वाढलेले होते. चौकशी केली तर कळलं की त्यांना गाडी मागवून केस कापण्यासाठी जावं लागतं. गाडी आली की ते जाणार आहेत. निकेतने सलूनमध्ये केस कापायला आलेले मुलं पाहिले. त्यांना पाहून तो सुनीलला म्हणालो आपण आश्रमात जाऊन केस कापले पाहिजेत. सुनील लगेच तयार झाला. गेले दीड वर्षे निकेत सुनील सैनी आणि आणखी एका सलूनवाल्याला घेऊन अनाथाश्रम, अंध आश्रम, बेघर निवारा केंद्र, वृद्धाश्रम अशा ठिकाणी सेवा देतात. त्यातही टिटवाळामधीस म्हसकळचा पारस बालाश्रम, उल्हासनगर मनपाचे बेघर निवारा केंद्रांमध्ये ते दर ४५ दिवसांनी जातात. कर्जतच्या सावित्रीफुले निवारा केंद्रातही ते सेवा करतात.
लॉकडाऊनमध्ये सुनील सैनी राजस्थानला परतला. अडचण झाली. आता आश्रमांमधील प्रवेश सुरु होईल. मुलांचे, वृद्धांचे, बेघरांचे केस कापायचे कसे ? निकेतला प्रश्न पडला. त्यानेच मार्गही शोधला. ओळखीच्या सलूनवाल्या मित्रांकडून त्याने केस कापण्याचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. आता परवानगी मिळताच तो स्वत: केस कापणार आहे.
त्याला विचारलं, हे काम का शिकलास? निकेत म्हणाला, मला समाजसेवेची नशा आहे. ४५ दिवस झाले की मला वाटते आश्रमातील मुलांचे, लोकांचे केस वाढले असतील. मी तिथं जातोच जातो. आता लॉकडाऊनमुळे शक्य झालं नाही. आता सुनील नसेल तर काम अडू नये म्हणून स्वत: शिकलो. अनेक मुलांच्या डोक्यात खवले असतात. वृद्धांच्या डोक्यात रिकामपणात खाजवून झालेल्या जखमा असतात, त्यांच्यावर उपचार कसे करावं ते कळत नाही. हायड्रोजन लावतो. पण इतर उपचार कळावेत, म्हणून डॉक्टरांना आवाहन करणारी पोस्ट केली.”
निकेतच्या कामाला समाजातूनही सहकार्य लाभतं. त्याचा सलूनवाला मित्र सुनील सैनी, सहकारी जसे सरसावले तसेच इतरही आहेत. उल्हासनगर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांनी केस कापण्याचे किट घेऊन दिलं.
मधल्या काळात निकेत एनडीआरएफच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाला. पूर परिस्थिती, भूकंप, चक्रीवादळातील मदतकार्याचं प्रशिक्षण घेतलं. नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यानं एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं.
समाजसेवा हजारो करतात. पण निकेश समाजसेवेची आणखी एक संधी शोधून काढतो. परत ते काम बंद पडू नये म्हणून स्वत:च शिकून घेतो. पुन्हा त्यात आरोग्य समस्या आढल्यानं त्यावरील उपायांसाठीही प्रयत्न करतो. सर्वच मला वेगळं वाटलं.
डॉक्टरांना निकेतला मार्गदर्शन करायचे असेल, औषधं सुचवायची असेल, कुणाला औषधं द्यायची असतील तर त्याच्या आवाहनला नक्की प्रतिसाद द्या.
– तुळशीदास भोईटे
९८३३७९४९६१
Inspiring story. Very well written.