मुक्तपीठ टीम
जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला आहे. सांगलीप्रमाणेच बहुमत असूनही भाजपाने सत्ता गमावली आहे. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्रित रणनीती आखून भाजपचे बहुमत असतानाही सत्तांतराचा चमत्कार घडवला. त्यासाठी त्यांनी ठाण्यातील एका हॉटेलची निवड केली. गुलाबराव नगरसेवकांसह तिथेच थांबले आणि सत्तांतराचा चमत्कार घडवत भगवा फडकवला.
या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. जळगावात महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या आहेत. निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या २७ नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले होते. हे २७ नगरसेवक शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात दाखल झाले होते. हे नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हे नगरसेवक स्वत:च्या मर्जीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.
जळगाव मनपातील संख्याबळ
भाजप : ५७
शिवसेना : १५
एमआयएम : ३