कोरोना संकटातही बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना उत्तम सेवेची साथ दिली. काही दिवसांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्यात आल्या. या नव्या बस ताफ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. केंद्र सरकारने फेम इंडिया योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला या बस पुरवल्या आहेत. त्यामुळे आता नव्या मार्गांवर बससेवा सुरु करणे शक्य होत आहे. आता बेस्टची गारेगार बस नव्या मार्गांवर धावणार आहेत. त्यातील दोन मार्ग सुरुही झालेयत.
बेस्टची एसी बस ए-३७० ही मुलुंड (पूर्व) मधील म्हाडा कॉलनी ते केळकर महाविद्यालयापर्यंत जाईल. तर दुसरी एसी बस शिवाजीनगर जंक्शन ते राज कपूर चौकातून पुढे ट्रॉम्बे पर्यंत जाईल. या दोन्ही नव्या एसी बस सेवा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. प्रवाशांना आरामदायक प्रवास मिळावा आणि कामावर जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी वातानुकूलित एसी बेस्ट बसेस सर्व मेट्रो स्टेशनवरही फीडर मार्गांच्या बाहेर तैनात करण्यात आल्या.
सर्व नवीन सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन इलेक्ट्रिक बसेस ध्वनीमुक्त आहेत आणि पारंपारिक बसेसप्रमाणे एक्झॉस्ट मधून गॅस उत्सर्जित करत नाहीत. या नव्या इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार आहे.