मुक्तपीठ टीम
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात दररोजच नवनवीन आणि धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ सापडली. तपासात एक इनोव्हा गाडीही पुढे आली. त्यानंतर एनआयएच्या चौकशीत तिसर्या मर्सिडिझ कारचीही माहिती उघड झाली. ती नेमकी कुणाची याचा आता एनआयए शोध घेत होती. तिचा मालक कळला नसला तरी ती वाझेंच्याच वापरातील असल्याचे आता एनआयएने स्पष्ट केले आहे.
आता सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीत नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नसून पांढरा कुर्ता पायजामा घातला होता.
सचिन वाझे हे वापरत असलेल्या महागड्या गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. जवळपास ५,७५,००० लाखांची रोकड सापडली आहे. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे ज्याच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते, अशीही माहिती तपास यंत्रणेने दिली आहे.
अँटिलीया प्रकरणात एनआयए दररोज नवीन खुलासे करत आहे. त्या दिवशी सकाळी ही गाडी पाहण्यासाठी आलेली व्यक्ती सचिन वाझे होते आणि त्यांनी पीपीटी किट नसून कुर्ता – पायजामा घातला होता हे आता उघडकीस आले आहे. सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये यासाठी त्यांनी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. तसेच डोक्याला रूमाल बांधला होता. एवढंच नाहीतर त्यांनी तोंडावर मास्कही लावला होता, त्यामुळे त्यांचे केवळ डोळेच उघडे दिसत होते.सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या ड्रायव्हरनंच याबाबतची माहिती एनायएला दिलेल्या जबाबात नोंदवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्याविरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.