मुक्तपीठ टीम
देशात नोटाबंदीनंतर सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. यामुळे काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा बसेल असे सांगण्यात आले होते. पण आता केंद्र सरकार २ हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा छापण्याचे आदेश दिलेले नाहीत. याचाच परिणाम म्हणून, देशभरात पसरलेल्या एकूण नोटांमधील दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या ३.२७ टक्क्यांवरून २.०१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ३० मार्च २०१८ पर्यंत २००० रुपयांच्या ३३६.२ कोटी नोटा प्रचलित असून २६ फेब्रुवारी २०२१ रोजी तो २४९.९ कोटींवर आला आहे. किंमतीकडे पाहिलं तर मार्च २०१८ मध्ये एकूण सर्कुलेशनमध्ये ३७.३६ टक्के भाग हा २०००च्या नोटांचा होतो, त्यात आता १७.७८ टक्क्यांने घट झाली आहे. ठाकूर यांनी सांगितले की, कोणत्या मूल्याच्या किती नोटा छापल्या पाहिजेत, याचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून घेण्यात येतो. तर आता दोन हजार रुपयांच्या नोटांनबद्दल बोलायचं झाल्यास २०१९-२० आणि २०२० ते २०२१ मध्ये नोटांची छपाईच करण्यात आलेली नाही
रिझर्व्ह बँकेकडून दोन हजाराच्या नोटा सर्कुलेशनमधून कमी करण्याचा प्रयत्न सतत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
- २०१६-१७ मध्ये २००० रुपयांच्या ३५४.३ कोटी नोटा छापल्या गेल्या.
- २०१७-१८ मध्ये ११.५ कोटी नोटा छापल्या होत्या.
- २०१८-१९ मध्ये ४.६७ कोटी नोटा छापल्या गेल्या.
सरकारने दोन हजारांच्या नोटा एक-दोन वर्षानंतर चलनातून काढून टाकण्याचे काम सुरू केल्याचे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याची चर्चा त्यामुळेच सुरु झाली आहे.
पहिल्या सत्ताकाळात ५००-१०००च्या नोटांवर बंदी, आता?
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी सरकारने देशात प्रचलित जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करत ५००आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा आणल्या. काळ्या पैशाला आळा बसेल असे सांगत सरकारने २००० ची नोट चलनात आणली होती. या सरकारच्या निर्णयावर त्यावेळी विरोधी पक्षाने अनेक प्रश्न ही उपस्थित केले होते.