मुक्तपीठ टीम
ज्यांनी १२वी मध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हा विषय घेतला नसेल आता ते विद्यार्थीही इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेऊ शकतात. इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने याबाबत माहिती दिली आहे.
कॉन्सिलने त्यांच्या अप्रूव्हल हॅन्डबुकात इंजिनीअरिंगच्या यूजी अभ्यासक्रमात (बीई / बीटेक) प्रवेशासाठी बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिक या दोन विषयांचा पर्यायी म्हणून उल्लेख केला आहे. आतापर्यंत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात हे विषय अत्यंत महत्त्वाचे होते. आता कॉन्सिलच्या नवीन हॅन्डबुकनुसार फिजिक्स / मॅथ्स/ केमिस्ट्री/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ बायोलॉजी/ इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस/ बायोटेक्नॉलॉजी/ टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट/ अॅग्रिकल्चर / इंजिनीअरिंग ग्राफिक्स/ बिजनेस स्टडीज किंवा एंटरप्रेन्योरशिप या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या विषयात १२वीमध्ये किमान ४५% तर आरक्षित गटातील ४०% गुण असणे आवश्यक आहे. एआयसीटीईने विद्यापीठांना वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅथ्स, फिजीक्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉईंगचा ब्रिज कोर्स करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन, त्यांना बीई, बीटेक प्रोग्रामच्या आवश्यकतेनुसार पात्रता मिळू शकेल. एआयसीटीईने नमूद केले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच (एनईपी २०२०) अंतर्गत एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये मोकळीक देण्यासाठी हा बदल केला गेला आहे. नवीन नियमांनुसार एआयसीटीईने मेडिसीन आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बीई, बीटेकचे मार्गही उघडले आहेत.
याशिवाय जे लोक इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा करतात त्यांनाही बीई-बी.टेकमध्ये लॅटरल प्रवेश मिळू शकेल.
पाहा व्हिडीओ: