मुक्तपीठ टीम
मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. पोलिसांमधील काही अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
दैनिक सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मनसुख हिरन प्रकरणावर भाष्य केलं आहे.
- विरोधी पक्षनेते फडणवीस यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच सूर गवसला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ त्यांच्यावर राहिला, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांचं उपरोधिक कौतुक केलं आहे.
- मात्र, त्याचवेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे.
- ‘मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात.
- विरोधी पक्षनेते पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात.
- हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत,’ अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.
- ‘फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या.
- एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली.
- त्यांचे वकिली चातुर्य वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते.
- मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते.
- अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?,’ असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
- ‘खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.
- मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
- ‘एखाद्या खोट्या प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे.
- पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. पण म्हणून फडणवीसांच्या पोलिसांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करू नये.
- मनसुख प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.
- २४ तासांत का ‘एनआयए’ची एन्ट्री
- ‘मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे.
- सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी?
- केंद्रात भाजपचे सरकार असल्यानेच हे घडू शकले!
- महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे,’ असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
- मनसुख हिरेन प्रकरणातही असेच घडेल!
- ‘अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले.
- काही दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी किणी प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते.
मृत किणी यांचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यात आला होता. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.