मुक्तपीठ टीम
राज्यामध्ये दि. २४ सप्टेंबर २०२२ अखेर ३० जिल्ह्यांमधील १७५७ गावांमध्ये फक्त २१,९४८ जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. यापैकी ८०५६ पशूधन उपचाराने बरे झालेले असल्याची माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरीत बाधित पशूधनावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ८१.६१ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १७५७ गावातील ३६.६० लक्ष पशूधन आणि परिघाबाहेरील १०.७० लक्ष पशूधन अशा एकूण ४७.३० लक्ष पशूधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशूधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवूद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी देखील लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व ४८५० पशूवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लम्पी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रती लसमात्रा रु. ३/- प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. सर्व खासगी पशूवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशूसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत असून, यासाठी त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय पशूवैद्यकांनी तसेच खाजगी पशूवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिल्या.
लम्पी आजार केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार आढळून आलेला नाही. हा आजार प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने लम्पी आजार होण्याची भीती नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.
मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले, असून ती जनावरे आता रोगमुक्त झाली आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.
मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण ३२२६ गोवर्गीय जनावरे असून ३२०६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. या उपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक १९१६, ०२२ २५५६ ३२८४, ०२२२५५६३२८५ व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक १९६२ यावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. पेठे यांनी केले.