मुक्तपीठ टीम
देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. ई-श्रम पोर्टल श्रमिक वर्गाला उत्पन्नाचे वेगळे पर्यायही उपलब्ध करून देते. ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत २७.६९ कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ९४ टक्के म्हणजे जवळपास २६ कोटी कामगार दरमहा १० हजार रूपयांपेक्षाही कमी कमावतात. ई-श्रम पोर्टलच्या नवीनतम आकडेवारीवरून, ही माहिती समोर आली आहे. तसंच पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ७४ टक्के कामगार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांमधील आहेत.
या राज्यांमध्ये सर्वाधिक नोंदणी
- नोंदणीच्या बाबतीत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि ओडिशा ही पाच राज्ये पुढे आहेत.
- नोंदणीकृत कामगारांपैकी ५२.११ टक्के कामगारांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे.
- ९.९३ टक्के घरांमध्ये काम करतात तर ९.१३ टक्के बांधकाम क्षेत्रात काम करतात.
७४% एसटी, एससी, ओबीसी वर्गातील कामगार
- ४.३६ टक्के लोक १० हजार ते १५ हजार दरम्यान आहे.
- पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ७४ टक्के कामगार हे समाजातील मागासलेल्या घटकातील आहेत.
- त्यापैकी ४५.३२ टक्के ओबीसी, २०.९५ टक्के अनुसूचित जाती आणि ८.१७ टक्के अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत.
- सर्वसाधारण श्रेणीतील कामगारांची संख्या २५.५६ टक्के आहे.
२०२१ मध्ये मागास कामगारांची संख्या ७२.५८%
- नोव्हेंबर २०२१ मध्ये, असंघटित क्षेत्रातील १० हजार रुपयांपेक्षा कमी दरमहा कमाई करणाऱ्या कामगारांची संख्या ९२.३७ टक्के होती.
- त्यावेळी पोर्टलवर ८ कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली होती. पोर्टलवर नोंदणीकृत एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील कामगारांची संख्या ७२.५८ टक्के होती.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी वाढल्याने समाजात मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचे दिसत आहे. या पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या सुमारे ३८ कोटी आहे.
ई-श्रम पोर्टलचा हेतू काय आहे?
- देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एनडीयूडब्ल्यू तयार करणे हे ई-श्रम पोर्टलचे उद्दिष्ट आहे.
- हे पोर्टल २६ ऑगस्ट २०२१ रोजी लाँच करण्यात आले.
- या पोर्टलद्वारे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे.
६१.७२ टक्के कामगार १८ ते ४० वयोगटातील कामगार
- ६१.७२ टक्के कामगार १८ ते ४० वयोगटातील असून २२.१२ टक्के कामगार ४० ते ५० वयोगटातील आहेत.
- पोर्टलवर नोंदणीकृत १३.२३ टक्के कामगार ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
- २.९३ टक्के लोक १६ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत.
- पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांपैकी ५२.८१ टक्के महिला आणि ४७.१९ टक्के पुरुष आहेत.