मुक्तपीठ टीम
येथे येत्या २८-२९-३० ऑक्टोबर रोजी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी आयोजित सहावे पर्यावरण संमेलन ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. २९ (शनिवार) रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री ना. उदय सामंत, खा. सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, अहमदनगरच्या उप वनसंरक्षक सुवर्णा माने (भा.व.से.) यांची उपस्थिती असेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन होईल.
संमेलनाचा उद्घाटन समारंभ २९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. संपन्न होईल. राज्यभरातील प्रतिनिधी पहिल्या दिवशी शुक्रवारी (२८) सायंकाळी शिर्डीत दाखल होतील. २९ रोजी सकाळच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी २.३० ते ३.३० वा. ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’ या विषयावर WORLD WATER COUNCILचे सदस्य रघुनंदन रामकिसन लाहोटी यांचे व्याख्यान होईल. दुपारी ३.३० ते ४.३० वा. ‘संत साहित्यातील पर्यावरण’ या विषयावर आदिवासी पुरस्कार विजेते कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. प्रा. विशाल महाराज फलके मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५.०० ते ५.४० वा ‘शिर्डीतील पर्यावरण’ या विषयावर Green ‘N Clean Shirdi Foundationचे अध्यक्ष अजित पारक, सायंकाळी ५.४० ते ६.१० वा. ‘विदेशातील पर्यावरण संवर्धन काम’ या विषयावर अमेरिकेतून संगीता तोडमल भूमिका मांडतील. रविवारी सकाळी १०.०० ते ११.०० वा. ‘जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी’ या विषयावर पर्यावरण विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. बी. जे. भोसले यांचे व्याख्यान होईल. सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वा. संमेलनाचा समारोप समारंभ होईल. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक, ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांची विशेष उपस्थिती असेल. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीखंडेश्वर माध्यमिक विद्यालय, उखलगाव, ता. श्रीगोंदाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान पाचपुते, शिर्डी पोलिस स्टेशनचे डी.वाय.एस.पी. संजय सातव, माजी शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण) दिनकर टेमकर, ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया उपस्थित असतील. समारोप कार्यक्रमात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि ‘जलदूत’ संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख वक्ते असतील.
हे पर्यावरण संमेलन शिर्डीतील श्रीसाई आश्रम शताब्दी मंडप, साई आश्रम नंबर १ भक्तनिवास परिसर येथे संपन्न होईल. संमेलनाला पूर्वनोंदणी केलेले राज्यभरातील साडेचारशे हून अधिक पर्यावरणप्रेमी प्रतिनिधी उपस्थित असतील. अशी माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे आणि मार्गदर्शक-समन्वयक राज देशमुख (संस्थापक – WE चांगुलपणाची चळवळ) यांनी दिली. संमेलनात सहभागी होण्यासाठी / संमेलन विषयक अधिक माहितीसाठी मो. ८९९९५३३६८३ येथे संपर्क साधावा.