मुक्तपीठ टीम
ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये भारतात घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट उघड केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले होते. दहशतवाद्यांना उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. या कटाती माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. हे दहशतवादी मॉड्यूल देशभरात सीरियल बॉम्बस्फोट घडवणार होते.
दिल्ली पोलिसांची धडक कारवाई
- दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी पाकिस्तानच्या कटाची माहिती दिली.
- दिल्ली पोलिसांनी एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये कारवाई केली.
- या कारवाईदरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांव्यतिरिक्त, आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- अशा प्रकारे एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून पकडण्यात आले आहे.
- पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव ओसामा आणि दुसऱ्याचे नाव झिशान आहे.
दहशतवादी कसे करणार होते घातपात?
- दिल्ली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोटांचा कट होता.
- सणांच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी स्फोट करणार होते.
- अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे काम येत्या सणासुदीच्या काळात आयईडी लावणे होते.
- नवरात्री आणि रामलीला आयोजनांच्यादरम्यान गर्दीच्या जागा हे त्यांचे लक्ष्य होते.
- दहशतवाद्यांकडून स्फोटके, शस्त्रे आणि उच्च दर्जाचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
मस्कतमार्गे पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी नेले
- या दहशतवाद्यांना मस्कतमधून पाकिस्तानला घेऊन दहशतवादी प्रशिक्षण दिले गेले, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली.
- पोलिसांकडे १० टेक्निकल इनपूट होते.
- सर्वात आधी महाराष्ट्रातील सालेम पकडला गेला.
- त्याच्यानंतर दिल्लीत दोघांना अटक झाली.
- त्यानंतर तिघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. यातील दोन आरोपी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते.
- त्यांना मस्कतहून जहाजाने पाकिस्तानला नेण्यात आले.
- तेथे फार्म हाऊसमध्ये ठेवून स्फोटके बनवणे आणि एके47 चालवण्याचे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
- या दोघांसोबत १५ बांगलाभाषिक आरोपीही होते.