वीणा जोशी
बाल लैंगिक शोषण या विषयावर व्यापक जनजागृती करणारी आणि आपल्या मुलांच्या सुरक्षेविषयी बोलण्यासाठी कधीही उशीर झालेला का नसतो ह्याकडे लक्ष केंद्रित करणारी अर्पणद्वारा आयोजित केली गेलेली एक राष्ट्रीय मोहीम मुंबई, १४ नोव्हेंबर २०२२: ज्या देशामध्ये लैंगिकतेविषयी बोलणे हे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते, तिथे लैंगिकता किंवा लैंगिक शोषण ह्याविषयी संभाषण होणे हे दुर्मिळच आहे. भारतात दर दोन मुलांमागे एका मुलाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार, लैंगिक शोषणाच्या ९७% घटनांमध्ये शोषण करणारी व्यक्ती पीडित मुलाच्या परिचयाची आहे. बाल लैंगिक शोषणावर वेळीच उपचार न झाल्यास, पीडित व्यक्तीच्या भावी आयुष्यात तिच्या विचारांवर, वर्तनावर आणि भावनांवर तात्पुरते आणि दीर्घकाळ टिकणारे दुष्परिणाम दिसू शकतात.
बाल लैंगिक शोषण प्रतिबंधाच्या आणि उपचारांच्या संदर्भात, मुंबईस्थित अर्पण ही बाल-हक्कांच्या दृष्टिकोनातून काम करणारी संस्था असून, प्रत्येक मुलाला शोषणापासून सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे, असा अर्पणचा ठाम विश्वास आहे. लहान मुले व प्रौढांना वैयक्तिक सुरक्षेविषयी प्रशिक्षित करण्यासाठी अर्पण सतत अभिनव पद्धतींवर भर देत असते, ज्यामुळे परिवर्तनात्मक बदल दिसून येत असतो.
अर्पणद्वारा आयोजित – बाल सुरक्षा सप्ताह २०२२ बाल सुरक्षा सप्ताह ही बाल लैंगिक शोषणाच्या समस्येविरुद्ध समाजप्रबोधन करण्यासाठी आणि संघटित कृतीस चालना मिळण्यासाठी सहकार्यावर आधारित अशी लोकचळवळ आहे. ह्या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय व बिगरशासकीय संस्था, शाळा, कॉर्पोरेट कंपन्या (उद्योजक), कलाकार, पालक आणि विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि बाल लैंगिक शोषण ह्या विषयावर समाजामध्ये असलेली निषिद्धतेची भावना दूर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधाचा आवाज बुलंद करतात. यंदाच्या मोहिमेचा विषय आहे #NeverTooLate (#कधीचउशीरझालेलानसतो). आम्ही सर्व जण असे मानतो की, उपचारांची खरी सुरुवात जागरूकतेने होते आणि जागरुकता हे प्रतिबंधाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. बाल लैंगिक शोषण समजून घेण्यासाठी, त्याबद्दल शिकण्यासाठी तसेच एखाद्या मुलाला वैयक्तिक सुरक्षा शिकवण्यासाठी #NeverTooLate (#कधीचउशीरझालेलानसतो). बाल लैंगिक शोषणाच्या अनुभवाबद्दल बोलण्यासाठी आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातातून सावरण्यासाठी #NeverTooLate (#कधीचउशीरझालेलानसतो). तसेच जर एखाद्या मुलाला कोणत्याही प्रकारे इजा केली जात असेल, तर त्याविरुद्व आवाज उठविण्यासाठी व त्या मुलाचे रक्षण करण्यासाठी #NeverTooLate (#कधीचउशीरझालेलानसतो). अर्पणद्वारा आयोजित बाल सुरक्षा सप्ताहाविषयीची अधिक माहिती www.childsafetyweek.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सप्ताहासाठी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरची निवड का केली?
- १४ नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
- प्रतिबंध, उपचार आणि न्याय ह्याद्वारे बाल लैंगिक हिंसा संपुष्टात येण्यासाठी हा जागतिक दिवस १८ नोव्हेंबर रोजी पाळला जातो.
- जागतिक बाल शोषण प्रतिबंध दिन (१९ नोव्हेंबर)
- जागतिक बाल दिन (२० नोव्हेंबर)
अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया म्हणतात, “या मोहिमेमध्ये प्रत्येकाचा वैयक्तिक सहभाग असणे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर मुलांचे लैंगिक शोषणापासून रक्षण करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी मुलांसोबत काम करणारी जी संपूर्ण यंत्रणा किंवा परिसंस्था आहे, मग त्यात त्यांचे शिक्षक असतील, पालक असतील किंवा अन्य प्रौढ असतील, अशा सर्वांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाद्वारे सक्षम करणे हेदेखील तेवढेच गरजेचे आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, अर्पण बाल सुरक्षा सप्ताह राबवण्यासाठी पुढाकार घेत आहे आणि त्यामध्ये सहभागी होत आहे.” ह्या सप्ताहामध्ये विविध सामाजिक भागीदारांसाठी अनेक उत्साहवर्धक व उत्कंठावर्धक ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम आयोजित केले जातील. ह्यामध्ये गटचर्चा (पॅनल डिस्कशन्स), शालेय स्पर्धा, साहित्य/आशय निर्मिती, मुलं, शिक्षक आणि पालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक जण बाल लैंगिक शोषण प्रतिबंधामध्ये आपले योगदान देऊ शकतो.
बाल सुरक्षा सप्ताह काय आहे?
‘बाल लैंगिक शोषणमुक्त जग’ ह्या आपल्या ध्येयाच्या दिशेने मोठी झेप घेण्यासाठी अर्पणने २०१९ पासून बाल सुरक्षा सप्ताहाची (१४ ते २० नोव्हेंबर) सुरुवात केली. बाल सुरक्षा सप्ताह ही बाल लैंगिक शोषणाच्या समस्येविरुद्ध व्यापक समाजप्रबोधन करण्यासाठी आणि संघटित कृतीस चालना मिळण्यासाठी सहकार्यावर आधारित अशी लोकचळवळ आहे. ह्या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय व बिगरशासकीय संस्था, शाळा, कॉर्पोरेट कंपन्या (उद्योजक), कलाकार, पालक आणि विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि बाल लैंगिक शोषणावरील संवादाशी निगडीत समाजामध्ये असलेली निषिद्धतेची भावना दूर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले संदेश अधोरेखित करतात.
अर्पण ही बाल लैंगिक शोषणाच्या समस्येवर अविरतपणे काम करणारी भारतातील पुरस्कारप्राप्त संस्था आहे. अर्पणला तिच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ६ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मुंबईस्थित अर्पण, ही भारतातील सर्वात सुपरिचित स्वयंसेवी संस्थांपैकी एक आहे, जी ह्या समस्येवर १२० पेक्षा अधिक सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशकांसोबत लहान मुले व प्रौढ ह्यांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक सुविधा पुरविते. गेल्या १५ वर्षांपासून अर्पणने २० लाखांपेक्षा अधिक मुले व प्रौढांसोबत काम केले आहे. अर्पणविषयी अधिक जाणून घेण्यासाठी www.arpan.org.in ला भेट द्या.
चौकशीसाठी संपर्क – श्रीमती वीणा जोशी – veena@arpan.org.in