मुक्तपीठ टीम
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडात ४५७ पुरातन वस्तू सापडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या उत्खननात ४५७ वस्तू समोर आल्या. त्यातील काही पुरातन वस्तू आहेत. एक वर्षापूर्वी, मंदिराच्या आवारात मणिकर्णिका कुंड नावाची एक विहीर सापडली होती. त्याच नावाची आणखी एक विहीर वाराणसीत आहे.
असे मानले जाते की, मंदिर बांधकामाच्यावेळीच ही विहीर बांधली गेली होती. त्यामुळे ती पुरातन काळातील असू शकते. विहीर ही बऱ्याच वर्षांपूर्वी बुजवली गेली होती. सुमारे ७० वर्षांपूर्वी ही विहीर पूर्णपणे झाकलेली होती. पूर्वी या विहिरीतले पाणी पवित्र म्हणून आंघोळीसाठी वापरले जात असे. अंबाबाई मंदिराच्या गर्भगृहातील तीर्थ व स्नानगृह या कुंडात सोडले जायचे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी उत्खनन केलेल्या वस्तू सादर करताना सांगितले की, “आम्हाला उत्खननस्थळावरून तांब्यांची भांडी, देवतांच्या दगडांची रचना, जुनी नाणी, बॅरेल व गोळ्या सापडल्या आहेत. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही खोदकाम करत आहोत. आतापर्यंत आम्ही ११ मीटरच्या खोलीवर पोहोचलो आहोत. दोन आठवड्यांत काम झाल्यावर कुंडाची मूळ रचना योग्य प्रकारे दिसून येईल.”
समितीकडून खोदकामाचे काम नोंदविले जात आहे. खोदलेली वाळू जतन केली जात आहे आणि इतर वस्तूंसाठी ती चाळली जाईल. एकदा उत्खनन झाल्यावर कुंडाची तपासणी करण्याचे काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. पुरातत्व विभागाने अवजड यंत्रसामग्री वापरू नका असे सांगितले होते. त्यामुळे ते हाताने केले जात आहे. आठ महिन्यांपूर्वी हे काम सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: