मुक्तपीठ टीम
मुंबईत तिसऱ्या लाटेचा कहर वाढता आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण १२ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे रोजच्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा वीस हजारांवर पोहचला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्णवाढ होत असूनही कुठेही घबराट माजलेली नाही. कारण मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच मुंबईत उपलब्ध असलेल्या ३५ हजार खाटांपैकी सध्या फक्त ५ हजार ९०० खाटांवर रुग्ण आहेत. तर ८३ टक्के खाटा रिकाम्या आहेत.
मुंबईतील रुग्णालयांमधील ८३ टक्के खाटा रिकाम्या!
- मुंबईत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण १२ टक्क्यांनी जास्त आहे.
- दररोज २० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे.
- परंतु मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.
- परंतु रुग्णांमध्ये लसीकरण झालेल्यांची संख्या केवळ ४ टक्के आहे.
- मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी ३५ हजार खाटांची सोय आहे. त्यावर केवळ ५ हजार ९०० रुग्ण आहेत. तर ८३ टक्के खाटा रिकाम्या आहेत.
- मुंबईत व्यापक लसीकरण झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त असला तरी तो तेवढा घातक ठरत नाही अस दिसत आहे.
- तरीही ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांच्यासाठी हा नवा प्रकार धोकादायकच आहे.
मुंबईत ऑक्सिजनची दुसऱ्या लाटेएवढी गरज नाही!
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मनपाचे सर्वत्र कौतुक झाले.
- तिसऱ्या लाटेच्यावेळी मनपाने दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिप्पट, दररोज ६९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.
- त्यासाठी मनपाने १ हजार १५० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. सध्या तरी १० मेट्रिक टन ऑक्सिजनपेक्षा जास्त गरज भासत नाही.
- दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा दररोजचा वापर २३५ मेट्रिक टन इतका होता, हे लक्षात घेतलं तर परिस्थिती घाबरू नये पण काळजी घ्यावी अशी असल्याचे स्पष्ट होते.