मुक्तपीठ टीम
भारतीय संशोधकांनी 3D प्रिंटेड नॅनोपार्टिकल कोटिंगच्या N95 मास्कची निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. या 3D प्रिंटेड मास्कचं वैशिष्ट्य असे की ते पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत. तसेच पुनर्वापर करता येण्यासाठी ते धुता येणारे, गंधहीन, गैर-अॅलर्जिकआणि सूक्ष्मजीवविरोधी आहेत. या चार स्तर असलेल्या मास्कचा बाह्य स्तर सिलिकॉनने तयार केला असून त्याच्या वापरावर अवलंबून असलेली त्याची आयुर्मर्यादा पाच वर्षांची आहे.
कोरोना सारख्या संसर्गापासून मानवाला संरक्षण देण्यासाठी हा मास्क सुपरिचित असला तरी सिमेंट कारखाना, वीटभट्ट्या, कापूस कारखाने आणि यासारख्या कारखान्यांमध्ये जिथे कामगारांना सतत धुळीच्या संपर्कात काम करावे लागते, अशा ठिकाणी या मास्कचा वापर करता येऊ शकेल. या मास्कचा वापर करताना आपल्या गरजेनुसार ज्या ठिकाणी ते वापरले जाईल त्यानुसार फिल्टर बदलून त्यात बदल केले जाऊ शकतात. यामुळे सिलिकोसिस सारख्या फुफ्फुसाच्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. या मास्कचे नाव नॅनो ब्रेथ असून या मास्कसाठी ट्रेडमार्क आणि स्वामित्वहक्क दाखल करण्यात आला आहे.
मास्कमध्ये चार स्तरीय फिल्टरेशन यंत्रणा प्रदान केली आहे ज्यामध्ये फिल्टरच्या बाह्य आणि पहिल्या थराला सूक्ष्म कणांचे आवरण आहे. दुसरा स्तर उच्चकार्यक्षमतेचा फिल्टर आहे, तिसरा स्तर 100 µm फिल्टर आहे आणि चौथा स्तर आर्द्रता शोषक फिल्टर आहे.