मुक्तपीठ टीम
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीन तानसा-२ द्वारे सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा अप-लाईन मार्गाचा १११७.५ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ७४५ रिंग्सच्या साहाय्याने २५७ दिवसात पूर्ण करण्यात आला.
”सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानक दरम्यान भुयारीकरण आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण ८० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींच्या आणि पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे. अतिशय जिकिरीचे हे कार्य आमच्या टीमने कौशल्यपूर्णरित्या पार पाडले आहे.”असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित सिंह देओल यांनी सांगितले.
मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे.या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत तीन भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.
पॅकेज-३ च्या भुयारीकरणाचा तपशील पुढील प्रमाणे
१) सायन्स म्यूझियम ते वरळी (अप लाईन- २०७२ मी, डाऊन लाईन- २०५७ मी)
२) सायन्स म्यूझियम ते महालक्ष्मी (अप लाईन- १११७.५ मी)
मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५२.६ कीमी म्हणजेच ९६.५% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.