मुक्तपीठ टीम
बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल २२ मृतदेह कोंबून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात लोकांचा मोठा संताप दिसून येत आहे. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर आज तातडीने दोन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयाकडे दोन रुग्णवाहिका
जिल्हा प्रशासनाकडून स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. १७ मार्च २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णावाहिका नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून रुग्णावाहिकेची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर आज आणखी दोन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत.