प्रा.शुध्दोधन कांबळे / व्हा अभिव्यक्त!
एकविसाव्या शतकात भारतीय चित्रपट खूप बदलला आहे, विशेषतः ओटीटीच्या काळात कंटेट बेस सिनेमा चालतो कास्ट बेस नाही. चित्रपटाची भाषा, कथानक सांगण्याचे तंत्र आणि चित्रपटाची कथा यासर्व गोष्टीमध्ये आपला सिनेमा तरुण झाला आहे, याचे कारण आहे चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारे अनेक तरुण दिग्दर्शक. या शतकाच्या सुरुवातीला २००१ मध्ये गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर याने ‘दिल चाहता है’ या सिनेमाने आपल्या करिअरची सुरूवात दिग्दर्शक म्हणून केली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैञी दिन म्हणून आपण सर्वञ साजरा करतो. याच पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट २००१ ला तिन मिञांची कथा असलेला हा चिञपट रिलीज झाला. या चित्रपटाला येत्या १० ऑगस्टला वीस वर्षे पूर्ण होतील. वीस वर्षाच्या कालावधीनंतरही हा चित्रपट आजही ताजा वाटतो.
या चित्रपटाला सर्व स्तरातून चांगले क्रिटीकल रिव्हीव मिळाले कारण हा चित्रपट तरुणाची भाषा बोलत होता. जय-विरुच्या फिल्मी मैञीची व्याख्या जागतिकीकरणात कशी बदलली गेली हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. माझ्यासारखे अनेक प्रेक्षक जे आज वयाच्या चाळीशीत पोहचले, जेव्हा हा चित्रपट आला होता तेंव्हा ते वीस पंचवीस वर्षाचे होते. अशा सर्व प्रगल्भ प्रेक्षकांना हा चित्रपट आजही पाहावा वाटतो कारण त्यातून त्यांच्या प्रेम, मैञी आणि त्याकाळातील एन्जॉय याबद्दलच्या आठवणी ताज्या होतात. या चित्रपटात आकाश (अमीर खान), समीर (सैफ अली खान)आणि सिध्दार्थ (अक्षय खन्ना) या तिघांच्या मैत्रीची कथा आहे. या तिघांच्या आयुष्यात आणि मैत्रीत कॉलेजच्या एन्जॉय पासून ते आयुष्यातील जबाबदारी सांभाळण्यापर्यंत कसे चढ उतार येतात याचे चित्रण करण्यात आले आहे. हे तिघे जेंव्हा गोव्यात ट्रीपला जातात तेंव्हा एका बीच बसून एक जहाज पहातात, ते जहाज हळूहळू त्या तिघांच्या नजरेआड होते. हे पाहून सिध्दार्थ (सिध्द) म्हणतो “आपले आयुष्यपण असेच आहे, आपणही या जहाजासारखे काही दिवासांने एकमेकांच्या नजरेआड जाउ.” काही दिवसांनी हे सिध्दचे विधान खरे ठरुन या तिघांमध्ये अंतर येऊन ते अलग होता आणि काही वर्षानंतर पुन्हा एकत्र येतात. या तिघांचे स्वभाव खूप वेगळे असतात, आकाश कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार न करणारा पण पुढे एक गंभीर पुरुष बनतो आणि समीर कुठल्याच गोष्टी बद्दल कॉन्फिडन्स नसणारा एक आत्मविश्वास असलेला तरुण बनतो. या चित्रपटात अक्षय खन्नाने सिध्दचे कॅरेक्टर केले, जो शांत व प्रगल्भ तरुण आहे आणि एक चित्रकार आहे, तो त्याच्या पेक्षा जास्त वयाच्या तारा (डिंपल कपाडीया) च्या प्रेमात पडतो. हे पण भारतीय चित्रपटात पहिल्यांदा घडत होते की, नायक एका वयस्कर महिलेच्या प्रेमात पडताना दाखविले गेले. अक्षय खन्नाच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम रोल म्हणून या रोलकडे पाहिले जाते. प्रीती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या वाट्याला आलेली भुमिका छान केल्या.
या चित्रपटाचे संगीत शंकर, एहसान व लॉय यांनी दिले. याच चिञपटामुळे ते फिल्म इंडस्ट्रीत सेटल झाले. कोई कहे.. सारखे तरुणाईचे गीत, दिल चाहता है.. मैत्रीचे गीत, कैसी है यह रुत… हे रोमँटीक गीत आणि तनहाई… हे विरह गीत, हे सर्व गाणे आजही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात. या गीताचे बोल आणि चित्रपटातील संवाद हे सारे प्रस्थापित सिनेमांच्या वेगळे होते आणि म्हणूनच ते सर्वांना खूप आवडले. चित्रपटाची कथानक सांगण्याची पध्दत पण खूप वेगळी आहे. या चित्रपटानंतर अशा चित्रपटांचा एक वेगळा जॉनर तयार झाला. त्यानंतर आलेले, जवानी दिवानी, जिंदगी ना मिलेगी दुबारा, थ्री इडीयटस, वेक अप सिध्द यासारख्या अनेक चित्रपटात ‘दिल चाहता है’ चे प्रतीबींब दिसते म्हणून हा चित्रपट एक ट्रेंड सेटर चित्रपट आहे.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)