मुक्तपीठ टीम
अयोध्येत भव्य श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी देणगी म्हणून जमा झालेले १५ हजार चेक बाऊन्स झाले आहेत. ते क्लिअर झाले असते तर मंदिरासाठी आणखी २२ कोटी मिळाले असते. मंदिराच्या बांधकामासाठी केंद्राने स्थापन केलेल्या न्यास श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ऑडिट रिपोर्टनुसार, “खात्यांमध्ये कमी रक्कम असल्याने किंवा काही तांत्रिक समस्यांमुळे चेक बाऊन्स झाले आहेत.”
ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, बँका तांत्रिक अडचणी सोडविण्याचे काम करीत आहे. संबंधितांना पुन्हा एकदा दान करण्यास सांगत आहोत. या चेकपैकी जवळपास २००० चेक अयोध्येतून जमा झाले होते. १५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत देणगी गोळा करण्यासाठी देशव्यापी मोहिमेदरम्यान हे चेक जमा केले गेले. या मोहिमेदरम्यान सुमारे ५००० कोटींची रक्कम जमा केली गेली. मात्र न्यासाने अद्याप एकूण रकमेची अंतिम आकडेवारी जाहीर केलेली नाही.
विशेष म्हणजे रामजनभूमीच्या मंदिरासाठी निधी समर्पण मोहीम राबविण्यात आली. गेल्या महिन्याभरापर्यंत लोकांनी मंदिर बांधण्यासाठी देणगी दिली. राम मंदिरात दरमहा १ कोटी रुपयांची देणगी येत आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की ट्रस्टच्या देणगीची एकूण रक्कम सुमारे ३५०० कोटी आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी १ हजार कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य होते. मात्र, देणग्यांची रक्कम ३ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप एकूण देणगी मोजण्यात आलेली नाही. लवकरच ३१ मार्चपर्यंत देणगी म्हणून मिळालेली रक्कम मोजली जाईल.