मुक्तपीठ टीम
संपूर्ण जग कोरोनासोबत लढा देत असताना, सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाईल अशी आशा होती, आणि तसेच झाले. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, “पुढच्या वर्षी आरोग्यावर २.२३ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर गेल्यावर्षी ९४,४५२ कोटी रुपये आरोग्य विभागावर खर्च झाले.” यावेळेस आरोग्यावर १३७ टक्के खर्च वाढवला आहे. पण खरचं आरोग्यासंबंधीत खर्चात एवढी वाढ झाली आहे का? आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे की तसे झालेले नाही. फक्त चलाखी झाली आहे. इतर खात्यांचा निधी आरोग्य खर्चात दाखवून तो वाढवलेला आहे. त्यामुळे आरोग्यासाठीचा अर्थसंकल्पीय तरुतुद वाढवलेली नसून जी वाढ दिसत आहे ती फक्त सुज आहे.
या वेळेस अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी हेल्थ अँड वेल बीइंगवरील खर्च सादर केला. त्याबद्दल खूप कौतुक झाले. आरोग्यावरील खर्च वाढवणे अपेक्षित होते, त्यामुळे प्रशंसा झाली. पण आरोग्य कार्यकर्त्यांन बारकाईनं अभ्यास केला असता, दाखवलेल्या आरोग्य निधीत अनेक अशा विभागांचे निधी आहेत, जे आरोग्य खात्यांतर्गत येत नाहीत.
आरोग्य खात्याच्या निधीत आयुष खाते, पिण्याचे पाणी आणि मल निसा:रण आणि कोरोना लसीकरणावर होणारा खर्च देखील जोडला आहे. पिण्याचे पाणी आणि मल निसा:रण जलशक्ती मंत्रालयांतर्गत येते.
आरोग्य मंत्रालयाला नेमके किती पैसे मिळाले
- गेल्या वर्षी आरोग्य मंत्रालयाला ६७,११२ कोटी रुपये मिळाले होते.
- कोरोना आल्यानंतर हा खर्च ८२,९२८ कोटी रुपये करण्यात आला.
- या वेळेस प्रत्यक्षात आरोग्य मंत्रालयाला ७३,९३१ कोटी रुपये मिळाले आहेत.
- हा आकडा गेल्या वेळेपेक्षा ११% कमी आहे.
सरकारने दावा केलेला निधी आरोग्यावरीलच!
एकीकडे आरोग्य कार्यकर्ते सरकारने आरोग्य खात्याचा निधी वाढवल्याचा दावा चलाखीचा असल्याचे म्हटले असतानाच दुसरीकडे ज्या विभागांचा खर्च आरोग्य खर्चात दाखवला आहे ते आरोग्याशी संबंधित असल्याने तसे करणे गैर नसल्याचा दावाही केला जातो. कोरोना लसीकरणही आरोग्य सेवेचाच एक भाग आहे, त्यामुळे तो खर्चही आरोग्यसेवेवरीलच आहे.
आरोग्यावर कुणाचा किती खर्च?
- नॅशनल हेल्थ प्रोफाइल मध्ये २०१७-१८ मध्ये प्रत्येक व्यक्तीवरील आरोग्य खर्च १,६५७ रुपये होता.
- प्रत्येक दिवशी ४.५ रुपये.
- नॅशनल हेल्थ अकाउंट्स २०१७-१८ मध्ये लोकांनी वर्षभरात आरोग्यावर स्वत:चे ३.४० लाख रूपये खर्च केले आहेत.
- जर याचा अंदाज लावला तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्यावर सुमारे २,५७० रुपये खर्च केले आहेत.
- म्हणजे सरकारपेक्षा लोकचं त्यांच्या आरोग्यावर जास्त पैसे खर्च करतात.