मुक्तपीठ टीम
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी सभागृहात निवेदन केलं. या गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना पुढील दोन अधिवेशनांमध्ये सहभागी होता येणार नाही.
भाजपच्या या आमदारांना केलं निलंबन
- आशिष शेलार
- पराग आळवणी
- योगेश सागर
- राम सातपुते
- नारायण कुचे
- बंटी भागाडीया
- हरीश पिपळे
- जयकुमार रावल, सिंदखेडा
- अभिमन्यू पवार, औसा
- अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व
- गिरीश महाजन
- संजय कुटे, जळगाव जामोद, (बुलडाणा)
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
सभागृहात नेमकं काय घडलं?
- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला.
- केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता.
- त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली.
- त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली.
- उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो, मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला.
- त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला.
- त्यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही.
- अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं.
- त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.
- त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला.
- तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- सभागृह तहकूब झाल्यानंतरही हे सदस्य शांत झाले नाहीत.
- त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला.
- अध्यक्षांना शिवीगाळ केली, असा आरोप आहे.
- स्वत: तालिका अध्यक्षांनी ही माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली.