मुक्तपीठ टीम
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ देशाच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधण्याचे अवघड काम करते. बीआरओने नुकतेच ११० फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम फक्त ६० तासात पूर्ण केले. हा पूल बांधला ती जागा अवघड आणि दहशतवाद्यांचा वावर असणारी आहे. तरीही जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन जवळील वळणावर बीआरओने ठरवलं आणि बांधून दाखवलं.
११ जानेवारी रोजी जुन्या पुलाची भिंत कोसळली. त्यामुळे या दरीचा देशाच्या इतर भागांमधून संपर्क तुटला. स्वाभाविकच नव् पुलाची आवश्यकता भासली. तातडीने बांधायचा असल्याने बेली पूल बांधायचे ठरले. बेली पुल पूर्वनिर्मित स्टील पॅनल्सपासून बनविला जातो. हे पॅनेल्स कमी वेळात जोडले जाऊ शकतात.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग ४४ ची देखरेख करणाऱ्या नागरी प्रशासनाने बीआरओला या कामात सहकार्य करण्याची विनंती केली. सर्वेक्षणानंतर १४ जानेवारी रोजी पुलाचे बांधकाम सुरू झाले. कमांडिंग लेफ्टनंट कर्नल वरुण खरे यांच्या नेतृत्वाखाली ९९ रोड कन्स्ट्रक्शन कंपनी टीमने ६० तासात या पूलाचे काम पूर्ण केले.
बांधकाम टीममध्ये ६ अधिकारी, १० पर्यवेक्षक आणि ५० कामगार होते. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास या पुलाची चाचणी घेण्यात आली आणि संध्याकाळी नियमित वाहतुकीसाठी हा पूल सुरू करण्यात आला.
पाहा व्हिडीओ: