मुक्तपीठ टीम
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता पहिली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी देखील कायम ठेवण्यात आला होता.
विद्यार्थी हे आपल्या देशाचं भवितव्य, राष्ट्राची संपत्ती व उद्याची देण आहेत. त्यांच्या निकोप वाढीसाठी त्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण देणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत सरकारी शाळांच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करुन त्यांना ‘आदर्श’ शाळा म्हणून विकसित केले जात आहे.