मुक्तपीठ टीम
अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगाना वर्ष २०२० च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान भवन येथे ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा’निमित्त केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय सक्षमीकरण पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री व्दय रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, सचिव अंजली भावड़ा, उपमहानिदेशक किशोर सुरवाडे उपस्थित होते.
यावेळी एकूण ५९ व्यक्तींना तसेच शासकीय अशासकीय संस्थांना विविध श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १० व्यक्ती तसेच नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचा समावेश आहे. मूळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वरूपात सन्मानपत्र, पदक, आणि काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आली.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये चलन अक्षमता (महिला) श्रेणीमध्ये उत्कृष्ट कर्मचारी (स्वरोजगार) या श्रेणीमध्ये सांगलीच्या डॉ. पुनम उपाध्याय यांना पुरस्कृत करण्यात आले. जन्मत: ५० टक्के चलन अक्षमता असलेल्या डॉ. उपाध्याय यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एमडी, पीजीपीपी आणि पीजीडीईएमएस पदव्यूत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. कामगार आणि गरीब रूग्णांना नाममात्र दराने वैद्यकिय सेवा पुरवितात.
चलन अक्षमता (पुरूष) श्रेणीमध्ये कोल्हापूराच्या देवदत्त रावसाहेब माने यांना रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या तिस-या वर्षापासून माने यांच्यामध्ये ८६ टक्के चलन अक्षमता आहे. त्यांनी कलाशाखेत पदवी घेतली आहे. दिव्यांगांच्या कल्याण आणि अधिकारांसाठी औद्योगिक सहकारी संस्था नावाने संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. १० वर्षे ते वॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत. त्यांचा स्वयंरोजगार आहे.
चलन अक्षमता (महिला) या श्रेणीतील रोल मॉडेलचा पुरस्कार लातूरच्या डॉ. प्रीति पोहेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. पोहेकर १०० टक्के चलन अक्षमता या वर्गात मोडतात. त्यांनी पदवी, पदव्यूत्तर तसेच पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. प्राध्यापक म्हणून २००१ पासून सुरूवात केले. देश विदेशातील विविध परिषदेमध्ये त्यांनी मराठीसह इंग्रजीत प्रबंध सादर केलेले आहेत. त्या मानवाधिकार कार्यक्रमाशी निगडीत कार्यातही सक्रिय असतात.
LIVE: President Kovind presents National Awards for the Empowerment of Persons with Disabilities at Vigyan Bhavan https://t.co/9gvYuV4siv
— President of India (@rashtrapatibhvn) December 3, 2021
सर्वोत्कृष्ट दृष्टिबाधित कर्मचारी (महिला) या श्रेणीतील पुरस्कारासाठी मुंबईच्या निकिता वसंत राऊत यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राऊत या १०० टक्के दृष्टीबाधित आहेत. त्या अभ्यासात हुशार असून त्यांनी एमबीए, मास्टर्स ऑफ मैनेजमेंट स्टडीज, क्वालिफाइड यूजीसी नेट, सीएआईआईबी, एचआर मध्ये पदविका घेतली आहे. यासह राऊत यांना संगीताची आवड असल्याने त्यांनी संगीत विशारद आणि संगीत भास्कर या संगीत क्षेत्रातील पदवीही घेतल्या आहेत. सध्या त्या बैंक ऑफ बड़ौदा येथे सहायक महाव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या सर्वात कमी वय असलेल्या आहेत. त्यांना इतरही संस्थेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दिव्यांगांसाठी कार्य करणा-या वैयक्तीक श्रेणीमध्ये पुण्याच्या सकीना संदीप बेदी यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकीना या स्वत: १०० टक्के दृष्टीबाधित आहेत. त्यांनी टाटा इंस्टीटयूट ऑफ सोशल साइंसेस, मुंबईतून मेडिकल आणि मनोरोग सामाजिक कार्य या अभ्यासक्रमात एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी कामाची सुरूवात प्रकल्प अधिकारी म्हणून केली होती नंतर प्रकल्प संचालक म्हणून महाराष्ट्रात नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्समध्ये काम केले. मागील २२ वर्षांपासून दृष्टिबाधित मुलींना अद्यावत शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नरत आहेत.
दृष्टिबाधित (महिला) श्रेणीतील रोल मॉडेलचा राष्ट्रीय पुरस्कार बांद्रा (ईस्ट) ,मुंबई येथे राहणा-या नेहा नलिन पावस्कर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्या वयाच्या 8 व्या वर्षापासून १०० टक्के दृष्टिबाधित आहेत. त्यांनी समाजशास्त्र या विषयात बीएची पदवी घेतली आहे. त्या टेलीफोन ऑपरेटर म्हणून शासकीय सेवेत आहेत. त्या खेळाडू आहेत. त्यांनी शॉटपुट, डिस्कस थ्रो, वैली क्रॉसिंग आणि रैपलिंग इवेंट सारख्या खेळांमध्ये भाग घेतला आहे. यासह साहसी खेळांमध्येही त्यांची आवड आहे. त्यांनी काकीनाडा येथे ८ मिनीट ३० सेंकदात १२०० फीट टायरोलिन ट्रैवर्सला पूर्ण केले आहे. वर्ष २०१७ मध्ये भारत-नेपाळ एमेच्योर आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे.
दृष्टीबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेलचा राष्ट्रीय पुरस्कार नागपूरचे राजेश असुदानी यांना मिळालेला आहे. असुदानी जन्मत: १०० टक्के दृष्टिबाधित आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. , एलएलएम, एमएससी (एप्लाइड साइकोलॉजी) विषयात केले आहे.ते कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ताही आहेत. असुदानी यांनी एलएलबी आणि एमएध्ये १९ सुवर्ण पदके पटकावले आहेत. त्यांनी इंग्रजी, विधी, आणि मनोविज्ञान विषयात नेट केलेले आहे. अुसदानी यांची हिंदी आणि उर्दूत अधूरा आसमान एन एंथोलॉजी ऑफ गजल हा कवितासंग्रह आहे. वर्जिन वर्सेज या कविता संग्रहाचा अनुवाद हरी दिलगिरी या शिर्षकाखाली केला आहे. ते भारतीय रिजर्व बँकेत सहायक महाप्रबंधक या पदावर कार्यरत आहेत. दृष्टिबाधित बँक कर्मचारी कल्याण संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाव्दारे प्रकाशित २०व्या शतकातील ५००० नेत्यांच्या यादीत राजेश असुदानी यांचेही नाव आहे.
श्रवणबाधित (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेलचा राष्ट्रीय पुरस्कार औरंगाबादच्या सागर राजीव बडवे यांना प्रदान करण्यात आला आहे. ते १०० टक्के श्रवण बाधित आहेत. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण येथुन जलतरणमध्ये बीसीए, बीपीएड, एनआईएस डिप्लोमा घेतलेला आहे. त्यांनी सलग तीन वेळा २००५ , २००९ आणि २०१३ मध्ये डेफलिम्पिक्समध्ये भाग घेतला आहे. विविध राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत त्यांनी ८० पदके मिळविली आहेत. त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय जलतरण मीट (स्पेन ते मोरक्कोपर्यंत आणि जिब्राल्टर स्ट्रेट ते ज्यूरिख लेक प्रतिस्पर्धा स्विट्जरलँन्ड)मध्ये भाग घेतला आहे. क्रिडा क्षेत्रासह त्यांना कलेचीही आवड आहे. हैद्राबाद आणि मुंबईमध्ये झालेल्या कला प्रदर्शनात कलाकार म्हणून त्यांनी भाग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१९ मध्ये शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने बडवे यांना सन्मानित केलेले आहे.
बौध्दिक दिव्यांगता (पुरूष) श्रेणीतील रोल मॉडेलचा राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधील प्रथमेश यशवंत दाते यांना प्रदान करण्यात आला आहे. दाते जन्म: ५० टक्के बौध्दिक व्यंगतेने ग्रसित आहेत. ९ वी पास करून श्री दाते मागील १० वर्षांपासून लाइब्रेरी अटेंडेंट म्हणून पूर्णकालीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यापुर्वी वर्ष २०१० मध्ये त्यांना कुशल कर्मचारी या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झालेला आहे. प्रथमेश वर ‘टेल ऑफ ए हाफ चिक’ हा सिनेमाही बनलेला आहे. वर्ष २०१५ मध्ये जागतिक वर्ल्ड डाउन सिंड्रोम कॉग्रेस मध्ये ‘सेल्फ एडवोकेसी’ या विषयावर वक्ता म्हणून बोलविण्यात आले होते. यासह ‘राइजिंग द बार’ या लघुपटात त्यांनी काम केले आहे. या लघुपटाने वर्ष २०१६ च्या हॉलीवुड इंटरनॅशनल इंडिपेंडेंट डॉक्यूमेंट्री अवार्ड रिकग्निशन जिंकले होते. प्रथमेशच्या जीवनावर आधारित ‘कथा घाडकेनी हटेंची ’ पुस्तक प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकाचे दोन भाषेत अनुवाद ही झालेली आहे.
बौध्दिक दिव्यांगता (महिला) श्रेणीतील रोल मॉडेल चा राष्ट्रीय पुरस्कार मुळची महाराष्ट्रातील सध्या दिल्लीत वास्तव्यास असणारी देवांशी जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. या ५० टक्के बौध्दिक दिव्यांगता आहे. मागील आठ वर्षापासून देवांशी पुर्णकालीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. वर्ष २०१८ मध्ये कुशल कर्मचारी श्रेणीतील उत्कृष्ट कर्मचारीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. वर्ष २०२० मध्ये संयुक्त राष्ट्र जिनेवामध्ये एशिया पैसिफिक डाउन सिंड्रोम फेडरेशनमध्ये प्रतिनिधित्व करणारी एक अतिथी वक्ता होती. सुगम्य आणि समावेशी निवडणुक अभियानात वर्ष २०२० मध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेल्य जाहीरातीचा देवांशी महत्वाचा भाग बनली होती.
सर्वोत्कृष्ट दिव्यांग क्रीडा खेळाडू (महिला) या श्रेणीमध्ये वैष्णवी विनायक सुतार यांना सन्मानित करण्यात आले. ६५ टक्के चलन अक्षमता(पेशीय पक्षाघात) असूनही त्या टेबल टेनिस उत्कृष्टपणे खेळतात. मागील तीन वर्षात त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत दोन-दोन पदके जिंकली आहेत. वैष्णवी यांची आशियाई रैकिंगमध्ये ४ क्रमांक लागतो. तर जागतिक क्रमवारीत १७ वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र शासनाने त्यांना पैरा टेबल टेनिसमध्ये शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विभागाचे अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी स्वीकारला. सुगम्य योजनेतंर्गत नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ सार्वजनिक ठिकाणी अपंगस्नेही सुविधा निर्माण केल्या. यामध्ये शासकीय कार्यालयासह, सार्वजनिक ठिकाणांचाही समावेश आहे. आदिवासी मुलांचे वसतीगृह, शासकीय विश्रामगृह, फाळके स्मारक, बिटको रूग्णालय, जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, मुला-मुलींचे बालसुधारगृह, सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय, जिल्हा क्रीडा संकुल आदिंचा समावेश आहे.