मुंबई :- सुमारे ४८ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सलमान जुबेर परवीन या २९ वर्षांच्या प्रियकराला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. सलमान हा दुसरा गुन्हा असून यापूर्वी त्याच्यावर त्याच्याच प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, याच दरम्यान तिला तिच्या घरातून सुमारे ४८ लाख रुपये सलमान परवीनने चोरी केल्याचे निदर्शनास आले होते, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. २४ वर्षांची ही तरुणी अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरात राहते.
ती गोरेगाव येथील एका बारमध्ये स्टेज डान्सर म्हणून कामाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत तिची सलमान नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती, ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते, तिला सलमानने लग्नासाठी प्रपोज केले होते, तो आवडत असल्याने तिनेही त्याला लग्नासाठी होकार दिला होता, त्यानंतर ते दोघेही तिच्या घरी लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता, गेल्या काही महिन्यांपासून ती त्याच्याकडे लग्नाविषयी तगादा लावत होती, त्यावरुन त्यांच्यात खटके उडू लागले, त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. सलमानकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने १४ ऑक्टोंबरला ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती, या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच दरम्यान तिला सलमानने तिच्या घरातून हिरेजडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आले होते.
त्यानंतर तिने पुन्हा ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती, या तक्रारीनंतर सलमानविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच त्याला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात मार्च ते ऑक्टोंबर २०२० दरम्यान त्यानेच त्याच्या स्टेज डान्सर प्रेयसीच्या घरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी सात लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. लवकरच त्याच्याकडून अन्य चोरीचा मुद्देमाल जप्त केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.