मुंबई :- एकतर्फी प्रेमातून मालवी सुशील मल्होत्रा या अभिनेत्रीवर चाकू हल्ला करुन पळून गेलेल्या योगेशकुमार महिपाल सिंग या निर्मात्याला बुधवारी रात्री वर्सोवा पोलिसांनी वसई येथून अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला सोमवार २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हिमाचल प्रदेशची रहिवाशी असलेली मालवी ही सध्या अंधेरी परिसरात राहते. गेल्या वर्षी तिची योगेशकुमारशी ओळख झाली होती.
या ओळखीत त्याने तिला तो चित्रपट निर्माता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली होती, मात्र तिने त्याला नकार दिला होता, तरीही तो तिचा पाठलाग करीत होता. तिचा मानसिक शोषण करीत होता. २६ ऑक्टोंबरला ती सातबंगला येथील कॉफी कॅफे डेजवळून घरी जात असताना त्याने तिला पुन्हा प्रपोज करुन तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला त्याच्याशी काहीही बोलण्याची इच्छा नसल्याचे सांगून घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने रागात मी स्वत मरणार आणि तुलाही मारुन टाकणार अशी धमकी देऊन तिच्या पोटात चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी योगेशकुमारविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता, त्याचा शोध सुरु असतानाच त्याला बुधवारी रात्री वसई येथून पोलिसांनी अटक केली. मालवीवर हल्ला केल्यानंतर तो वसईला जात असताना त्याच्या कारचा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.