कलहंस हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसा एवढा दिसतो. हा हिवाळी पाहुणा रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या हंसाप्रमाणे दिसतो. शेपटीकडील भाग करडा, चोच मांसल गुलाबी असते. हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रात दुर्मिळ प्रमाणात आहे. पुढे दक्षिणेकडे सहसा आढळून येत नाही. हा पक्षी नद्या, सरोवरे, धान्याची शेती आणि गवती कुरणे अशा भागात आढळतो. पक्षी मित्रही या स्थलांतरित पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. चिंचणी येथील पक्षीमित्र प्रवीण बाबरे यांनी हे पक्षी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
२०१९मध्ये हे पक्षी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिसले होते. २०२०मध्ये ३१ डिसेंबर रोजी दिसले आहेत. पालघर जिल्ह्यात हे पक्षी दिसल्याची ही दुसरी नोंद आहे. मागील वर्षी फक्त दोन पक्षी आले होते आणि या वर्षी दोनपेक्षा अधिक पक्षी आले आहेत. स्थलांतरित पक्षांच्या अवैध शिकारींना रोखणे आणि त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणींची जपवणूक करणे गरजेचे आहे, असे मत पालघरमधील पक्षी अभ्यासक यांनी मांडलं आहे.
पालघर जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी म्हटली की, सौंदर्याने नटलेली किनारपट्टी संबोधली जाते. या किनारपट्टी भागात अनेक ठिकाण ही सुशोभित किनारपट्टी, पिकनिक पॉईंट आणि पर्यटन स्थळांनी सजलेली किनारपट्टी आहे. काही ठिकाणी ही किनारपट्टी गजबजलेली असली तरीही काही ठिकाण अशी आहेत की ती शांत आणि गर्द झाडा झुडपानी विस्तारलेली आहे. त्यामुळे अशा भागात स्थलांतरित विविध जातीचे पक्षी येऊन वास्तव्य व विहार करत असतात. सध्या ह्याच पक्षांची रेलचेल ह्या भागातील चिंचणी, वाढवण, तारापूर भागात पाहायला मिळते.