एकामागोमाग एक अशा आपल्या दोन एसटी कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं. आठ नोव्हेंबरची घटना रत्नागिरीतील. तिथं पांडुरंग गडदे एसटी चालकाने आत्महत्या केली. दुसरी घटना नऊ नोव्हेंबरची. जळगावमध्ये मनोज चौधरी या एसटी वाहकाने म्हणजेच कंडक्टरने जीवन संपवले. त्यांनी तर जीवन संपवताना एक चिठीही लिहिली. सध्या सत्तेत बसलेल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करणारी. कमी पगार आणि तो ही देताना अनियमितता, हे कारण त्याने स्पष्टपणे लिहिलंय. आत्महत्येसाठी जबाबदार मराठी माणसांचे ठाकरे सरकार असल्याचेही त्यांनी बजावलंय. शेवटी त्यांनी आपल्या कामगार नेत्यांना विनवलंय ते पीएफ आणि एलटीसी घरच्यांना मिळवून देण्यासाठी. बहुधा त्याचा एसटी महामंडळावर, सरकारवर तेवढाही विश्वास नसावा.
विश्वास ठेवावा, अशी परिस्थितीही नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी थेट आत्महत्याच केली, असंही नाही. गेले काही दिवस ते सातत्याने आपलं गाऱ्हाणं मांडतायत. पण मायबाप आघाडी सरकार रिकाम्या तिजोरीचे रडगाणे गात हक्काचा पगार टाळत आले. साखर कारखान्यांना थकहमी देताना तिजोरी रिकामी आहे, हे आठवत नाही. अनेकांचे प्रस्ताव अडवणारे अर्थमंत्री अजित पवार थकहमीचा निर्णय घेणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी होते. त्यांना तिजोरी रिकामी आहे ते फक्त एसटी कर्मचाऱ्यांचे हक्काचे पगार देतानाच आठवते का? इथं प्रश्न कारखान्यांना देण्याला विरोध करण्याचा नाही, तर त्यांना थकहमी देताना एसटी कर्मचाऱ्यांना का नाही, असा आहे. कारखाने चालले तर शेतकरी जगतील. पण थकहमी देताना सत्तेवर येताना घातलेल्या अटी का काढल्या गेल्या? त्यात जर थकहमीसाठी संचालक वैयक्तिक पातळीवर जबाबदार असतील, तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतरच निर्णय असे ठरले होते तर का ते बदलले? खटकतो तो हाच दुटप्पीपणा.
एकीकडे पगार द्यायचे नाहीत, दुसरीकडे बाहेरगावच्या ड्युटीवर गेलं नाही तर कारवाईचा बडगा उगारायचा. लाज वाटली पाहिजे.
मनोज चौधरी असो किंवा रत्नागिरीचे वाहक. त्यांच्या आत्महत्येसाठी फक्त आणि फक्त सध्या सत्तेवर असलेलं आघाडी सरकारच जबाबदार आहे. आता सरकारकडे पैसे नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे तिजोरीत खडखडाट आहे, असली फालतू कारणं देऊ नका. कारण जर तसं असतं, तर सर्वांचेच पगार बंद केले गेले असते. एसटी महामंडळाचेच का? इतर सर्व घरी असतानाही जे जीव धोक्यात टाकून राज्यभर फिरले. त्यांचेच पगार देताना सरकारला भिक का लागली?
सरकारने कर्मचाऱ्यांचे हक्काचे पगार वेळेवर द्यावेत. आधीच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार तुटपुंजे. आज अनेक कर्मचारी एसटीच्या सेवेसोबतच मोलमजुरी करून पोट भरत आहेत. लाज वाटावी असंच सारं. आज या मुद्द्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. योग्यच. चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकार . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला सुनावले. या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का? हा त्यांचा प्रश्न योग्यच. तसाच त्यांनी विचारलेला प्रश्न…जळगाव आणि रत्नागिरीच्या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार?
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची, त्यासाठी आरोप झालेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची भाजप आठवण करून देतेय. ते गैर म्हणता येणार नाही. या दोन आत्महत्यांसाठी सरकारमधील जबाबदार असणारे शोधलेच पाहिजेत. शोधून गुन्हेही नोंदवलेच पाहिजेत. कारवाईही झालीच पाहिजे. आज जर एका महिन्याचा पगार देता आला, तर तो आधी का नाही? तसेच उरलेल्या दोन महिन्यांच्या पगाराचे काय?
बसं झालं आता. जास्त तीव्र वाटेल. पण सरकारनं हवं तर मंत्रालय गहाण ठेवावं. पण कर्मचाऱ्यांचे हक्काचे पगार वेळेवर द्यावेत. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई पुरेशी आणि वेळेवर द्यावी. भाजपनं सरकारला धारेवर धरताना विरोधी पक्ष म्हणून योग्यच भूमिका बजावली.
फक्त एक आठवण गल्लीत आघाडी असेल तर दिल्लीत तुम्ही सत्तेत आहात. दरवेळी हे तुमच्यामुळे ऐकवतात, केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे थकवलेत. आघाडी सरकारला तसं रडगाणं गाण्याची संधी तुमच्यामुळे मिळतेय. महाराष्ट्राचे पैसे देण्यासाठी तुम्हीही दिल्लीश्वरांना सांगा. आघाडी सरकारला रडगाणं गाण्याची संधी मिळू देऊ नका.
जाता जाता सरकारला एकच सांगणं…जर सत्तेची जबाबदारी झेपत नसेल…तर ती सत्ता काहीच उपयोगाची नाही. अशी बिनकामीची सत्ता म्हणजे प्रेताला केलेला शृंगार. कितीही नटवलं तरीही प्राण नसल्यानं भीषणच वाटणारं. जिवंत नसल्यानं सारंच बिनकामाचं. कृपया संवेदना जिवंत ठेवा. सर्वांनीच.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील मानले जातात. सत्तेसाठी तुम्हाला मित्र सोडावा लागला.. सत्तेसाठी तुम्हाला हक्काचा सत्तेतील वाटाही सोडावा लागला. पण जर स्वत:ची राजकीय सोय पाहत सत्तेतील इतर दोन पक्ष पाहिजे तसे आर्थिक निर्णय घेत असतील तर किमान तुम्ही सामान्य कामगार, कर्मचारी, शेतकरी यांच्या हितासाठी हट्ट धरलाच पाहिजे. त्यासाठी सत्ता पणाला लावली तरी चालेल. किमान असं पत्र लिहून तुमच्या सरकारच्या नावानं कुणी आत्महत्या तरी करणार नाही. ते पाप तरी माथी नसावं.
– तुळशीदास भोईटे – मुक्तपीठ</strong
सरळस्पष्ट मतप्रदर्शन व्हिडीओसाठी लिंक क्लिक करा. नक्की पाहा –