मुक्तपीठ टीम
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने स्त्री-शक्ती ला सलाम करण्यासाठी यशस्विनी सन्मान पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांसाठी दि. २९ मार्च पासून अर्ज मागविण्यात येणार असून याची अंतिम तारीख १ मे २०२२ आहे. पुरस्कारार्थींची घोषणा ५ जुन २०२२ रोजी करण्यात येणार असून देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर होण्याच्या दिवशी म्हणजे २२ जुन रोजी हे पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे या पुरस्कारांची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने स्त्री-शक्ती ला सलाम करण्यासाठी यशस्विनी सन्मान पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. https://t.co/3ajXZEVuot pic.twitter.com/BT4JL1JzB1
— Supriya Sule (@supriya_sule) March 29, 2022
या क्षेत्रातील महिलांना मिळाणार ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’!
यशस्विनी कृषी सन्मान – २०२२
कृषी क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार’ या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची यासाठी निवड करण्यात येणार आहे.
कृषी / बागायती / दुग्धशाळा आणि इतर संबंधित कृषी उद्योगांमधील नाविन्यपूर्णरित्या कार्य करणाऱ्या शेतकरी स्त्रीसाठी, शेती, बागायती आणि शेती क्षेत्रातील संबंधित उपक्रमातील प्रगतशील व उत्कृष्ट स्त्री शेतकऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यशस्विनी साहित्य सन्मान – २०२२
साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार’ या नावाने ओळखला जाईल. साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
गत पाच वर्षात (दि. १ जाने. २०१७ ते दि. ३१ डिसेंबर २०२१ – दोन्ही दिवस धरून) प्रकाशित झालेल्या सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीस हा पुरस्कार दिला जाईल.
यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान – २०२२
- क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या एका महिलेस ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात येईल.
महिला क्रीडा मार्गदर्शिकेने राज्य, राष्ट्रीय स्पर्धा किंवा त्यावरील स्पर्धांमध्ये किमान पंधरा खेळाडू घडवलेले आवश्यक आहे.
पुरस्कार वर्षातील एक मे रोजी संपणार या वर्षा सह लगत पूर्व पंधरा वर्षांमध्ये महिला क्रीडा मार्गदर्शकाने घडविलेल्या खेळाडूंनी अत्युत्कृष्ट निकाल दाखवून अतुलनीय कामगिरी बजावली असली पाहिजे. - पुरस्कारासाठी अर्ज करणारा विचार करण्यात येणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकाचे महाराष्ट्रातील वास्तव्य जन्मापासूनच एक किंवा सलग पंधरा वर्षाचे असणे आवश्यक आहे. अशा क्रीडा मार्गदर्शक आणि घडविलेला खेळाडू महाराष्ट्रातील रहीवासी असला पाहिजे व त्याने महाराष्ट्र राज्याचे राज्य,राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले असले पाहिजे.
- तथापि राज्यातील क्रीडा मार्गदर्शकाने घडविलेल्या राज्याबाहेरच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी लक्षात घेता येईल.
- पुरस्कार इच्छुक महिला क्रीडा मार्गदर्शकाच्या कामगिरीचे मूल्यांकन त्या संबंधित खेळाडू चा मूळ क्रीडा मार्गदर्शक असल्यासच करावे.
(मूळ क्रीडा मार्गदर्शक म्हणजे संबंधित खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षण ज्या क्रीडा मार्गदर्शकाकडून घेऊन यश संपादन केले असा क्रीडा मार्गदर्शक होय.) - मूळ क्रीडा मार्गदर्शकांनी अर्जासोबत घडविलेल्या खेळाडूची विहित नमुन्यातील हमी प्रतिज्ञापत्रावर देणे आवश्यक राहील.
- क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना भौगोलिक मागासलेपण त्या त्या प्रादेशिक विभागातील क्रीडा सुविधांचा अभाव एखाद्या क्रीडा मार्गदर्शकाने खेळाडू घडविण्याच्या दृष्टिकोनातून केलेली असामान्य कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात येईल.
- क्रीडा मार्गदर्शकाने घडवलेल्या खेळाडूंनी उत्तेजक द्रव्य (डोपिंग) घेतल्याचे आढळून आल्यास व उत्तेजक द्रव्यांमुळे खेळाडूने संपादन केलेल्या कामगिरीचा विचार यशस्विनी सन्मान क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरिता झाला असल्यास अशा खेळाडूच्या मार्गदर्शकाचे देण्यात आलेला यशस्विनी सन्मान क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रद्द करण्याचे अधिकार प्रतिष्ठानला राहतील.
यशस्विनी उद्योजिका सन्मान – २०२२
औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
सदर व्यक्तीने आपल्या उद्योगाच्या माध्यमातून किमान पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असले पाहिजे. पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपला उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तीचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.
यशस्विनी सामाजिक सन्मान – २०२२
- सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
- सदर व्यक्तीने स्वत: किंवा त्याच्या संस्थेमार्फत सलग किमान पाच वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी , महिला चळवळीच्या अथवा संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्य केलेले असले पाहिजे.
यशस्विनी पत्रकारिता सन्मान – २०२२
- पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारासही ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
- पुरस्कारासाठी किमान ५ वर्ष शोध पत्रकारिता क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे.
- मराठी, हिन्दी आणि इंग्लिश भाषा मधील प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रोनिक मीडिया मध्ये शोध पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणे गरजेचे आहे
पुरस्काराचे स्वरूप
- पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ३५ वर्षे ते ६५ वर्षे असले पाहिजे. (सोबत शाळा सोडल्याचा दाखला (साक्षांकीत सत्यप्रत) जोडावा.)
- रुपये २१ हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
- या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी कृपया गुगल फॉर्मला भेट द्यावी ही विनंती!
अधिक माहितीसाठी यशवंत चव्हाण सेंटर, मुंबईच्या वेबसाईटला https://chavancentre.org/announcement/announcement-of-yashwini-honors-award भेट द्या.