मुक्तपीठ टीम
देशातील जनतेला परवडणारी आणि चांगल्या सुविधा असल्याचा दावा करणारे दळणवळाचे साधन म्हणजे भारतीय रेल्वे. रेल्वेचा प्रवास अगदी आरमदायक आणि कमी खर्चिक असतो. मात्र असं असताना भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या ड्रायव्हर्सची किती काळजी घेतली जाते? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या ड्रायव्हर्सना ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटची सुविधा नाही. यामुळे महिला ड्रायव्हर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. काही महिला पाणी पिणं कमी करतात. आजही भारतातील १४ हजार रेल्वे इंजिनांपैकी फक्त ९४ रेल्वे इंजिनातच शौचालयांची सुविधा आहे. त्यामुळे पुरुषांची तर होतेच पण महिला लोको पायलट्सची सहन न होणारी भयानक अडचण होते.
महिला लोको पायलटना मासिक पाळीच्या काळात अतिरिक्त समस्या…
पुरुषांसाठीही अनेक सुविधांचा अभाव आहे; पण महिला चालकांना मासिक पाळीच्या काळात जास्त अडचणी येतात, त्यामुळे बहुतांश महिला पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतागृहांच्या अभावामुळे सुट्टी घेणं पसंत करतात.
शौचालयाची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सारखीच…
कमी अंतराच्या गाड्या चालवणाऱ्या एका सहाय्यक लोको पायलटने सांगितले की, “शौचालयांच्या कमतरतेची समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्ये सामान्य आहे. मात्र, एक महिला व्यावसायिक म्हणून मला माझ्या मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक वेळी रजा घ्यावी लागणे खूप अपमानास्पद वाटते.’
त्या काळात वॉशरुमला न जाता ट्रेन चालवण्याची कल्पनाच करवत नाही. रेल्वेने कामाच्या वेळेबद्दल आणि आमच्या सुट्टीबद्दल सर्व व्यवस्था केली असली, तरी स्वच्छतागृहांची कमतरता ही रोजची लढाई झाली आहे. आम्हाला रोज कामावर जाताना या समस्येचा सामना करावा लागतो,’ असं त्यांनी सांगितलं.
आणखी एका ड्रायव्हर तरुणीने तिचा अनुभव सांगितला. तिला ट्रेन चालवण्याचे, अवघड प्रदेशात जाण्याचे आणि पश्चिम घाट रेल्वे मार्गावर आपले कौशल्य दाखवण्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रेन ड्रायव्हरची नोकरी मिळवली. पण तिच्या पाच वर्षांच्या नोकरीत तिचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून जातो. कारण ट्रेनमध्ये टॉयलेट नाही, अशा परिस्थितीत गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास तिला विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी भीती तिला वाटते.
सहा वर्षांपूर्वी लोकोमोटिव्हमध्ये बायो-टॉयलेट बनवण्याच्या कामाला सुरुवात
- सहा वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी बायो-टॉयलेटने सुसज्ज पहिल्या लोकोमोटिव्हची सुरुवात केली होती.
- परंतु आतापर्यंत केवळ ९७ बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
- भारतीय रेल्वेतील काही आकडेवारींवर नजर टाकल्यास, भारतीय रेल्वेकडे चौदा हजाराहून अधिक डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहेत.
- तर देशभरातील साठ हजार लोको पायलटपैकी सुमारे एक हजार महिला आहेत.
- यातील बहुसंख्य महिला लोको पायलट कमी अंतराच्या मालगाड्या चालवतात.
९७ इलेक्ट्रिक लोकोमध्ये टॉयलेट बांधले
रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की २०१३ मध्ये रेल्वे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आणि सततच्या मागणीनंतर, ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ (CLW)निर्मित इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये वॉटर क्लोसेट (शौचालय) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आतापर्यंत फक्त ९७ इलेक्ट्रिक लोकोमध्ये हे वॉटर क्लोसेट बसवण्यात आली आहेत.