मुक्तपीठ टीम
काँग्रेस पक्ष आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य खळबळ माजवणारे ठरले आहे.
नाना पटोलेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कशासाठी?
- नाना पटोले यांची काँग्रेस पक्षापासूनच राजकारणाची सुरुवात केली होती.
- त्यांनी नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
- २०१४ मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली.
- अल्पावधीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते स्वगृही परतले
- २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली
- महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आले होती.
- विदर्भातील ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते म्हणून नाना पटोले ओळखले जातात.
- पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील मराठा नेत्यांचा प्रभाव असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील ओबीसी नेत्याकडे दिल्याने सत्ता समतोल साधण्याबरोबरच मतदारांचा एक मोठा घटक पक्षाकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मानला जातो.
नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाणार हे निश्चित असून पक्षश्रेष्ठींकडून शिक्कमोर्तब झाल्यानंतर तातडीने त्यांनी राजीनामा दिला आहे.
विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोल होते, त्यामुळे पुढील अध्यक्षही काँग्रेसचाच होईल असे मानले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल”, असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांच्या विधानानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी जोर लावला जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सत्तापदांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत, अशी चर्चा आहे.