तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्राचा विषय आजच्या रविवारी माध्यमांमधील बातम्या दुष्काळ संपवणारा ठरला. ते पत्र म्हणजे लेटर बॉम्ब असल्याचा दावा करत सरनाईकांनी तो काँग्रेस राष्ट्रवादीवर टाकल्याचा दावा केला जात आहे. तर काहींना त्यांनी भाजपाला घातलेली साद वाटतेय. तर त्याचवेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडून नाहक होणाऱ्या जाचाचा, त्यांच्यामागे लागलेल्या ईडी ससेमिऱ्यासह उल्लेख केल्यानं ते भाजपाकडेही बोट दाखवत असल्याचेही शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते खास जोर देऊन सांगत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा प्रताप सरनाईकांच्या पत्राचा लेटर बॉम्ब नेमका कुणासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पत्रात लक्ष्य कोण कोण?
आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रात नेमकं कोण लक्ष्य आहे, यावर पत्रकार आणि राजकीय नेते सोयीनुसार अंदाज बांधत आहेत.
भाजपाचा नाहक त्रास
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थेट भाजपाकडेच बोट दाखवत आहेत. सरनाईकांनी भाजपावरच कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे, ते लिहिल्याचे आवर्जून सांगत आहेत. मात्र, तसे करताना ते प्रताप सरनाईकांच्या पत्रातील वेगळे मुद्दे मांडत नाहीत. जरी सरनाईकांनी त्या यंत्रणांचा नाहक त्रास म्हटले असले, शिवसेनेमुळे माजी झालेले खासदार विनाकारण बदनामी करतात, केंद्रीय यंत्रणाचे दलाल म्हणून काम करतात असा नाव न घेता किरीट सोमय्यांचा उल्लेख केला असला तरी त्यांचा भाजपाविरोध तेथेच सुरु होतो आणि तेथेच संपतो. फारतर आरेचं जंगल पुन्हा एकदा सुरक्षित जंगल केल्याबद्दल ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतात, तो एक मुद्दा अगदी ओढूनताणून भाजपाविरोधी म्हणून दाखवता येऊ शकतो. पण ते तसे नाही. त्यांच्या पत्राचा भर जास्तीत जास्त जुनं नातं जुळवा आणि नवं टाका यावरच दिसतोय.
निदान यामुळे प्रताप सरनाईक , अनिल परब , रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. ते असे म्हणतात, तेव्हा त्यांना आपली भूमिका अधिक व्यापक दाखवायची असावी, असे दिसते.
काँग्रेस – राष्ट्रवादीविरोधावर जास्त भर
१) एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात . तर दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला , असे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे.
२) त्यात काँग्रेस पक्ष ” एकला चलो रे ” ची भूमिका घेत आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते – कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते – कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
३) तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
४) त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर ” काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात , मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत ” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे . एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली . भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने , काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ” महाविकास आघाडी ” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे .
प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील वरील चार मुद्दे काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधातील त्यांची भूमिका स्पष्ट करतात. त्यांचे पहिले दोन मुद्दे गेले काही दिवस घडणाऱ्या राजकीय घडामोडीतून दिसून येत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शिवसेना वर्धापनदिन भाषणात शिवसेना सत्तेसाठी नसल्याचे मांडताना, स्वबळाचं बोलाल तर लोक जोड्यानं मारतील, हे बजावताना मित्रपक्षांविषयीही नाराजीच व्यक्त केली होती.
तेवढंच नाही शिवसेना फोडण्याच्या स्थानिक पातळीवरील प्रयत्नाना स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतिशय गंभीरतेने घेतले. राष्ट्रवादीचे आमदार मोहिते खेडमध्ये करत असलेल्या शिवसेनाविरोधी राजकारणाबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून तक्रारी येताच त्यांनी तातडीने इतर कुणाला नाही तर संजय राऊतांना पाठवले. सातत्यानं भाजपाकडूनच नाही तर काँग्रेसकडूनही संजय राऊत हे शिवसेनेचे नेते असले तरी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, अशी कडवट टीका होते. उद्धव ठाकरेंनी त्याच राऊतांना पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पाठवून राष्ट्रवादीला आवाज द्यायला लावला होता. त्यामुळे सरनाईक फोडाफोडीवर जे बोललेत त्याच्याशी तरी शिवसेनेत कोणी असहमत असेल असे होणार नाही.
पुढचा त्यांचा जास्त गंभीर असा आरोप आहे. तो म्हणजे, “आपल्यावर केंद्रीय यंत्रणांची वक्रदृष्टी जावू नये यासाठी महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत,” हा अतिशय गंभीर आरोप आहे. हा लेटर बॉम्बमधील खरा दारुगोळा आहे. आजवर अनिल देशमुख सोडून केंद्रीय यंत्रणांचा शिवसेनेशिवाय अन्य कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला थेट त्रास झालेला नाही. उलट प्रफुल्ल पटेलांपासून काही मोठ्या नेत्यांची मोठी प्रकरणे थंड्या बस्त्यातच टाकण्यात आल्याचे दिसते. यंत्रणा काही करत नसतील तर नेहमी आक्रमकतेने तुटून पडणारे माजी खासदार किरीट सोमय्याही त्या नेत्यांबद्दल मौनच बाळगून असतात. त्यामुळे सरनाईक उगाच काहीतरी बोलतात, असे म्हणता येत नाही.
शिवसेनेकडेही बोट
“राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना , कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे.” प्रताप सरनाईकांचे पत्राच्या शेवटच्या टप्प्यातील हे शब्द त्यांची व्यथा मांडणारे आहेत. त्यातून त्यांना शिवसेनेतील सहकारी नेत्यांकडेही बोट दाखवायचे असावे.
सरनाईक कोण?
आज या पत्रानंतर पत्रकार आणि अनेक नेत्यांच्याही तोंडी ते कट्टर शिवसैनिक असल्याचे वारंवार ऐकले. स्वत: प्रताप सरनाईकही तसे म्हणणार नाहीत. ते स्वत: एक व्यावसायिक आहेत. बिल्डर आणि हॉटेलियर. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते राजकारण करत होते. पण राष्ट्रवादी मुंबई-ठाणे पट्ट्यात एका मर्यादेपलीकडे जात नाही. त्यामुळे ते शिवसेनेत गेले. तेथे गेल्यावर मात्र त्यांनी निष्ठेने काम केले. तसे करताना भाजपा सेना युती सत्तेवर आल्यावर त्यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशीही चांगले जुळले. तसे असतानाही त्यांनी युती तुटल्यानंतर मीरी भाईंदरमधील अपक्ष आमदार ज्या भाजपाकडे गेल्या होत्या त्या गीता जैन यांना शिवसेनेकडे आणले. गीता जैन यांनी फडणवीसांचे जवळचे असणारे तत्कालिन आमदार मेहता यांचा भाजपात बंडखोरी करून पराभव केला होता. तेथेच पहिल्यांदा त्यांचे फडणवीसांशीही थोडे बिनसले असावे किंवा शिवसेना नेतृत्वाचा आणखी विश्वास कमवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असावा. असेल ते असेल. पण त्यांची ही चाल भाजपाला दुखावणारीच होती.
हे सारं सांगताना त्यांचे ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तेवढेसे जुळत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
नेमकं काय?
एक महत्वाचा मुद्दा. हे पत्र आज रविवार, २० जून २०२१ रोजी बाहेर आले असले तरी आमदार सरनाईक यांनी ते लिहिले आहे ९ जून २०२१ रोजी. म्हणजे शिवसेना वर्धापनदिनाच्या दहा दिवस आधी. ते मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात १० जून रोजी स्वीकारल्याचा स्टँपही आहे. खरंतर असं पत्र एवढं अधिकृतपणे कोणी देत नसते. ते तसे दिले गेले आणि आता बाहेर आले, याचा अर्थ काही गोष्टी कुणीतरी ठरवूनही करत आहे.
आमदार सरनाईक यांनी कोणत्याही नेत्याकडून आपल्याला मदत झालेली नाही ही व्यथा मांडतानाही थेट शिवसेनेचा, पक्षाच्या कोणताही नेता, मंत्री असा कुणाचाही उल्लेख करत नाहीत. याउलट ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भरभरून स्तुती करतात. अगदी भाजपाला, त्यातही फडणवीसांना दुखावणाऱ्या आरे जंगलाच्या निर्णयाबद्दलही.
तसेच त्यांनी माडंलेले मुद्दे शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील ऑफ दी रेकॉर्ड बाहेर येणारी खंतच अभिव्यक्त करणारे आहेत. सत्तेत असलेले मंत्री सोडले तर सत्तेबाहेरच्या शिवसेनेतील कोणालाही विचारले तरी हेच सांगतात.
तरीही त्यांच्या पत्रातून जे दिसतं त्यातून सध्याच्या त्यांच्या संकटाच्या काळातील एक संदेश त्यांनी उघडपणे दिला आहे. शिवसेनेतील ज्यांना भाजपाशी युती पाहिजे आहे, त्यांच्यापैकी मीही एक आहे, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. त्यामुळे शिवसेनेचा फायदा होईल, असे मतही त्यांनी ठासून मांडलेले आहे. त्यामुळे भाजपाला त्यांच्याविषयी कसा सॉफ्टकॉर्नर वाटू शकतो ते आज भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसलेच. अपवाद किरीट सोमय्यांचा. पण या पत्रात त्यांनी नाव घेतले नसले तरी दलाल, बदनामी करणारा वगैरे म्हणत त्यांचे वाभाडेच काढले आहेत. त्यामुळे ते चांगलं बोलणार तरी कसे?
काहीही घडू शकते असेच सध्या दिसत आहे. काँग्रेसचे नेते उघडपणे स्वबळाचं बोलतात. पण त्यात वेगळं असू शकतं. त्याबद्दल नंतर कधी. पण राष्ट्रवादीचं काय? उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमकतेने वागत सध्या दौरे काढताना दिसतात. खरी पॉवर त्यांच्याच हाती असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल नसेल पण संदेश तोच जातो. जेव्हा आम्ही राष्ट्रवादीचे नेते बसतो ठरवतो आणि मुख्यमंत्रीही तसे करतात, असे ते सांगतात, तेव्हाही खास जातो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी-ठाकरे भेटीनंतर शिवसेनेला विश्वसनीयतेचे प्रमाणपत्र देणे दिसते तसे साधेसोपे नसावे. नक्कीच काहीतरी गोम असावी. राजकारण आहे, पुढे काय घडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे प्रताप सरनाईकांनी पत्र लिहिले असले तरी त्यांना ते ड्राफ्ट करून देणारा जो कुणी असेल किंवा ज्यांनी ड्राफ्टला संमती दिली असेल तेच त्या पत्राचे खरे लाभार्थी ठरतील.
सत्ता बदलेल असेच नाही पण सत्तेतील समीकरणे सोयीनुसार बदलण्यासाठीच्या रणनीतीपैकी बरंच काही घडत असू शकतं.
सरनाईकांच्या पत्रातून असेच बरेच काही संकेत मिळत आहेत. पाहुया पुढे काय घडतं!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)
हे ही वाचा: आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं…