मुक्तपीठ टीम
दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. हे भाषण करतानाच अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडला यामुळे मोदींना अर्ध्यातच भाषण थांबवावे लागले. त्यानंतर त्यांनी ते पूर्ण केले, असा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यानंतर सोशल मीडियावर मोदींविरोधात #TeleprompterPM हॅशटॅग चालला. पण एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वाद निर्माण करणारा हा टेलिप्रॉम्प्टर न्यूज चॅनल्सच्या अँकर्ससाठी मोठा आधार असतानाही, अनेकदा खलनायकही ठरतो. हे उपकरण आहे तरी काय आणि ते कसं कार्य करते तेही आज आपण जाणून घेऊया.
टेलिप्रॉम्प्टर आहे तरी काय?
- टेलिप्रॉम्प्टर हे न्यूजच नाही तर अन्य विझ्युअल मीडियासाठीही महत्वाचे साधन आहे.
- टेलिप्रॉम्प्टर एक डिस्प्ले यंत्र आहे, ज्यावर असलेल्या स्क्रिनवर मोठ्या आकाराच्या अक्षरामध्ये जे वाचायचे असते ते स्क्रिप्ट दिसते.
- मोठे राजकीय नेते किंवा काही सेलिब्रिटी वापरतात तो टेलिप्रॉम्प्टर अत्याधुनिक इनविझिबल म्हणजे पारदर्शक काचेवर फक्त त्याच्यासमोर उभे असलेल्यालाच अक्षरे दिसतील असा असतो.
- न्यूज चॅनल्समध्ये तेवढे अत्याधुनिक टेलिप्रॉम्प्टर नसतात.
- न्यूजचॅनलमध्ये असलेल्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये ते अँकरच्या हातातील रिमोटने किंवा पायाने रिमोट दाबत चालवण्याची सोय असते.
- त्या टेलिप्रॉम्प्टरवर किंवा काचेतच कॅमेरा लेन्सही असते.
- अँकर तेथे पाहत बोलतात. त्यामुळे ते थेट आपल्याकडे पाहत बोलतात, असं प्रेक्षकांना वाटतं.
- अँकर जे वाचत असतात, ते न्यूज चॅनलमधील डेस्कवरील प्रोड्युसर सहकाऱ्यांनी टाइप केलेले असते.
मोठ्या नेत्यांचे टेलिप्रॉम्प्टर कसे काम करते?
- मोठे नेते जाहीर भाषणात किंवा परिषदेत वापरतात, त्या प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरला कॉन्फरन्स टेलिप्रॉम्प्टर म्हणतात.
- त्यामध्ये एलसीडी मॉनिटर तळाशी असतो, ज्याचा फोकस वरच्या दिशेने राहतो.
- वाचणाऱ्याच्या सभोवती ग्लास असतात, त्यावर LCDमॉनिटरवर चालणारा मजकूर दिसत राहतो.
- अशाप्रकारे वक्ता टेलिप्रॉम्प्टरच्या साहाय्याने कोणत्याही अडचणीशिवाय आपले भाषण पूर्ण करतात.
- बोलण्याचा वेग ऑपरेटरद्वारे नियंत्रित केला जातो, जो स्पीकरचे काळजीपूर्वक ऐकतो आणि तसा अक्षरांचा वेग ठेवतो.
- प्रेक्षकांना हे काहीच दिसत नाहीत.
- त्याला फक्त काच आणि त्यामागे उभा असलेला वक्ता दिसतो.
अँकरसाठी टेलिप्रॉम्प्टर कसे ठरतात खलनायक?
- अखेर टेलिप्रॉम्प्टर हे एक यंत्र आहे. त्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो.
- त्यामुळे चॅनलमध्ये अँकर ऑन एअर असताना टेलिप्रॉम्प्टर हँग झाला तर पुढचे कळत नाही.
- तोपर्यंत अँकरला न वाचताच केवळ सुचनांवर सावरुन नेणे आवश्यक असते.
- टेलिप्रॉम्प्टर लगेच रिस्टार्ट करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न होतो, पण दरवेळी ते शक्य नसतं.
- काहीवेळा टेलिप्रॉम्प्टर बंदच पडतो.
- अशावेळी संपूर्ण उरलेले बातमीपत्र हे अँकरला टेलिप्रॉम्प्टरविना रेटून न्यायचे असते.
- कानातील इअर फोन म्हणजेच इपीतून पीसीआरकडून कमांड दिल्या जातात.
- पण काहीवेळा त्या स्पष्ट नसतील किंवा अँकर तेवढ्या तयारीचे नसतील तर गोंधळ उडतो.
टेलिप्रॉम्प्टर ठरतो खलनायक…पण बहुसंख्य अँकर करतात मात!
- न्यूज चॅनलमधील अँकर्समधील कोण किती तयारीचा आहे, हे टेलिप्रॉम्प्टर समस्या उद्भवली की कळते.
- काहीवेळा लिहिणाऱ्यांनी चूक केली असली आणि अँकर रनऑर्डर वाचून आलेला नसेल तर ती चूक तशीच वाचतातही किंवा गोंधळतात.
- काहीवेळा अचानक कानातील ईपीवर कमांड देताना चुकून किंवा मानवी स्वभावाच्या प्रवृत्तींनुसार काहीवेळा काहीजण मुद्दामच चुकीच्या कमांडही देतात, त्याही वेळी तयारीचे अँकर नसतील तर गोंधळ उडतो.
- काहीवेळा सर्व चांगलं असेल, तर टेलिप्रॉम्प्टर बिघडल्यानंतर संपूर्ण तासभराचे बातमीपत्र टेलिप्रॉम्प्टरविना केवळ कानात मिळालेल्या हिंटवरून पुढे नेणारे अँकरही असतात.
- अर्थात काहीवेळा लाइव्ह बातमीपत्र सुरु असतानाच अँकर अस्वस्थ होईल, असे मोठ्या आवाजात ओरडण्याचे प्रकारही न्यूज चॅनल वर्क कल्चरच्या नावाखाली सर्रास केले जातात.
- अँकर त्याही परिस्थितीत चेहऱ्यावर अस्वस्थता, राग न दाखवता शांतपणे पुढे जात राहतात.
- असे अँकर्स हे टेलिप्रॉम्प्टर बिघडले तरी कितीही वेळ अँकरिंग जराही न अडखळता करू शकतात. त्यांचं ते कौशल्य हे खरोखरच अनेक मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठे असते, हे आता अनेकांना कळले असेल.
दाओस भाषणाच्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आलेले अस्वस्थतेचे भाव हे काहीवेळा अँकरच्याही चेहऱ्यावर येतात.
खरंतर सोमवार रात्रीच्या टेलिप्रॉम्प्टर वादामुळे जगातील तमाम अँकर जमात खूश असेल. आमची समस्या आता तरी जगाला कळली, असे म्हणत असेल!