मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे कडक नियम असूनही बँकांमध्ये फसवणूक होते. फसवणूक करणारे सामान्य लोकांना लुटण्यासाठी काही ना काही मार्ग शोधतात. वाढती फसवणूक लक्षात घेऊन अॅक्सिस बँक ग्राहकांना चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे. अॅक्सिस बँक उद्यापासून पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू करत आहे. त्यामुळे आयसीआयसीआय, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिसनंतर आता इतरही बँका ही सुरक्षा सुविधा सुरु करू शकतात. त्यामुळे प्रत्येक बँक खातेदाराने पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणजे काय आहे?
- पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चेकचा तपशील त्याच्या बँकेकडे पाठवावा लागेल.
- या सिस्टमद्वारे, ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे चेक पुन्हा कन्फर्म करावे लागतील.
- चेक देणाऱ्या व्यक्तीला चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता आणि देय रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही कळवावी लागेल.
‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ किती मर्यादा? कसं काम करते?
- पॉझिटिव्ह पे सिस्टम ५० हजार किंवा अधिकच्या बँक चेकद्वारे पेमेंटसाठी लागू आहे.
- बँकेच्या ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक तपशीलांची पुष्टी करावी लागेल, जेव्हा ते ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे बँक चेक जारी करेल.
- या सिस्टमद्वारे एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेकची माहिती देता येते.
- चेकचे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील पुन्हा पडताळले जातील.
- चेक ट्रंकेशन सिस्टम अंतर्गत चेक क्लियर करताना फसवणुकीपासून संरक्षण प्रदान करते.
- ही चेक गोळा करण्याची प्रक्रिया जलद करते.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा चेक पेमेंट सुरक्षेसाठी निर्णय
- भारतीय रिझर्व्ह बँकेने चेकवर आधारित व्यवहारांची सुविधा सुरक्षित करण्यासाठी १ जानेवारी २०२१ पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
- आयसीआयसीआय बँक २०१६ पासून आपल्या ग्राहकांना ही सुविधा देत आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित १ जानेवारी २०२१ पासून नवीन पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू केली होती.
- बँक ऑफ बडोदामध्येही ही सिस्टम लागू आहे.
- आता अॅक्सिस बँकेनंतर इतरही बँका पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे.