मुक्तपीठ टीम
आजची पिढी लग्नासंदर्भात आयडियल पार्टनरची स्वप्न पाहतात. पण यामध्ये भावनिक कमी आणि व्यावहारिक अपेक्षा जास्त असतात. या बदलत्या वातावरणात नातेवाईकांच्या साक्षीने, आशीर्वादाने पार पडणाऱ्या विवाहाच्या संस्कृती, परंपरेचा ऱ्हास होता कामा नये, असे मार्गदर्शन ‘आम्ही लग्नाळू – लग्न, पँडेमिक आणि अपेक्षा’ चर्चासत्रात देण्यात आले. कुळकर्णींच्या ‘पवित्रविवाह’ मॅट्रिमोनी संस्थेतर्फे १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ‘दादर सार्वजनिक वाचनालय’ येथे हा कार्यक्रम पार पडला. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या ‘पँडेमिक दरम्यान लग्नाची स्थिती’ या ऑनलाईन सर्व्हेक्षणातून विवाहईच्छुकांच्या लग्नाच्या निर्णयांवर झालेला परिणाम, अपेक्षा असे अनेक मुद्दे समोर आले. या सर्व्हेक्षणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने तरुण, तरुणी, कुटुंब उपस्थित होते. पत्रिका पाहणे, राशी, जोडीदाराचे स्वभाव, घटस्फोट अशा अनेक मुद्यांबाबत लग्नात स्थित्यंतरे येत आहेत. बघण्याचा कार्यक्रम ते डेटिंगपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे. ”पँडेमिकचा सर्व क्षेत्रांवर प्रभाव झाला. ज्यामध्ये लग्नाचाही समावेश आहे. नोकरी कपात, कमी पगार आदी कारणांमुळे विवाहईच्छुक तरुणांवर परिणाम झाला. पण आता सर्व पूर्ववत होत आहे. तरुणांना सुयोग्य जोडीदार मिळावा या हेतूने आम्ही तुळशी विवाहच्या शुभमुहूर्त निमित्त ‘आम्ही लग्नाळू’ मोहीम सुरु केली. तरुणांना मार्गदर्शन करणारे आजचे चर्चासत्र या मोहिमेचा शुभारंभ आहे.” असे ‘पवित्रविवाह’ मॅट्रिमोनीचे संचालक ऋषिकेश कदम म्हणाले. ”प्रत्येकाने आपले आयुष्य सोहळ्यासारखे जगावे. तो क्षण जपावा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद पहावा. जोडीदारांनी एकमेकांना माणूस म्हणून बघा, आहे तसं स्वीकारा. यासाठी संवाद महत्वाचा. नातं हे फारच पवित्र आहे, प्रेम पवित्र आहे. अशा पवित्र गोष्टीला लग्नाच्या स्वरूपात एकत्र करून विवाहईच्छुकांना सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी पवित्रविवाह संस्थेतर्फे करण्यात येणारे प्रयत्न वाखणण्याजोगे आहेत.” अशा भावना मानसोपचारतज्ञ डाॅ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केल्या.
लग्नाशी जोडलेल्या कायदेविषयक, वैद्यकीय, कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट या मुद्यांविषयी चर्चा करण्यात आली. ”लग्नामुळे दोन जोडीदारांसह दोन कुटुंबही एकत्र येतात. लग्नापूर्वी जोडीदाराची मेडिकल, एचआयव्ही टेस्ट अशा वैद्यकीय चाचणी करून घ्याव्यात. कुटुंबियांबद्दल जाणून घ्यावे. प्रत्येक आईवडिलांनी, तरुणांनी याबद्दल जागरूक रहावे.” असं फॅमिली कोर्टच्या अॅड. शर्मिली पुरव म्हणाल्या. ”लग्न करण्यापूर्वी एकमेकांना भेटताना जे काही आहे ते वास्तववादी असावं. स्पष्ट बोलावं, सांगावं. लग्नातील एक वास्तव म्हणजे कोणीही परिपूर्ण नसतं. घरातील वातावरण, प्रत्येकाचे स्वभाव, तडजोड अशा अनेक गोष्टी असतात. या गोष्टी आपण कशा मॅनेज करतो या गोष्टींवर लग्नाची वाटचाल अवलंबून असते.” अशा भावना लाईफस्टाईल स्पेशालिस्ट डॉ. नेहा वैद्य यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रमोद पवार, निमा पवार या कलाकारांसह ‘माय मातृभूमी फाऊंडेशन’चे अध्यक्ष निलय वैद्य उपस्थित होते.