डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
वारी ही आत्यंतिक शिस्तीने चालते हे कोणी सांगायची गरजच नाही. हैबतबाबांनी घालून दिलेल्या शिस्तीने आजही वारी चालते. ही शिस्त केवळ वारीच्या चालण्यातच असते असे नाही तर वारीच्या प्रत्येक आचार विचारातून ही शिस्त जाणवते. एवढा मोठा जनसमुदाय आटोक्यात ठेवणे म्हणजे किती कठीण काम आहे हे आपल्याला फक्त विचार करूनच लक्षात येते. पण दिंडी सोहोळयाच्या मार्गावरचा तुटपुंजा पोलिस बंदोबस्त पाहिला की वारी हे शिस्तबद्धतेचे चालते बोलते उदाहरण आहे हे जाणवते. जो काही थोडासा पोलीस बंदोबस्त सोहळ्याला लाभलेला असतो त्याला जास्तीत जास्त काम हे हौशे, नवशे आणि गवशे यांना सांभाळण्यासाठी करावे लागते. सोहळ्याचा नगारखाना पोहोचला की शिस्तीने चालणाऱ्या दिंडया सुरू होतात. ही शिस्त वारकऱ्यांनी स्वत: अंगिकारली आहे. गैरशिस्तीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला आहे असे कधीच घडले नाही. आणि याच विश्वासाने ड्यूटी बजावत असलेले पोलिस नगारखाना येताच आरामात पालखीच्या वाटेकडे दर्शनासाठी डोळे लाऊन बसतात.
दिंडीची ही शिस्त त्यांच्या रोजच्या गाण्याच्या अभंगातूनही दिसून येते. आपण जर बारकाईने कान देऊन ऐकले तर बहुतेकवेळा सगळ्या दिंडीमध्ये एकच अभंग चाललेला कानावर येतो. सकाळी दिंडी निघाल्यापासून ते रात्री तळावर पोहोचेपर्यंत विशिष्ट क्रमाने अभंग गायले जातात. सकाळी माऊली निघाली की विणेकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात दिंडीची वाटचाल सुरू होते. त्यानंतर ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष होतो. त्यानंतर विणेकरी रूपाचा अभंग म्हणतात.
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलि आवडी ॥
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवरु ॥
रूपाच्या अभंगानंतर मंगलाचरणाचे अभंग म्हटले जातात. त्यानंतर काकड आरत्या, भुपाळ्या, वासुदेव, आंधळे, पांगळे, जोगी, बालछंद, गवळणी अशा क्रमाने दुपारच्या भोजनापर्यंत अभंग गायले जातात.
दुपारच्या भोजन विसाव्यानंतर नाटाचे अभंग, हरिपाठ, गुरुपरांपरेचे अभंग, वारांचे अभंग अशा क्रमाने अभंग म्हटले जातात. प्रत्येक फडाचा किंवा दिंडीचा अभंग गाण्याचा विशेष क्रम असतो. मुक्कामाचे गाव जवळ येताच हरिपाठ गाईला जातो. आपल्या मुक्कामाचे ठिकाण येताच दिंडी भुईच्या मातीला वंदन करून विसाव्याला जाते.
पालखीच्या तळावर समाज आरती होते. पालखी भोवती गोलाकार दिंडया उभ्या राहून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात ठेका धरून नाचत असतात. पालखीचे आगमनानंतर चोपदाराने आपला चोप वर केल्यानंतर क्षणार्धात संपूर्ण तळावर एकदम शांतता निर्माण होते. कोणा दिंडीची तक्रार असल्यास ती दिंडी जागेवरून टाळ वाजवते. चोपदार दिंडीपर्यंत जाऊन तक्रारीचे निवारण करतात. तक्रार निवारणानंतर हरवल्या गवसल्याची जिनसांची यादी वाचून ओळख पटवून ती संबंधित माणसाला सुपूर्द केली जाते. शेवटी दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती सांगून माऊलींची आरती होते. त्यानंतर वारकरी आपापल्या मुक्कामावर जातात.
दिवसभराच्या चालण्याने हे वारकरी थकत कसे नाहीत हे एक न उलगडलेले कोडे आहे. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येक दिंडी मालकांनी वारकऱ्यांसाठी कीर्तन, भजन, प्रवचन असे काही कार्यक्रम आयोजित केलेले असतात. या सगळ्या कार्यक्रमातही वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला लाजवणारा असतो. विठ्ठलाच्या भेटीने आसुसलेला हा वारकारी विठ्ठलाच्या नामस्मरणाने आपली सारी दु:खे, श्रम विसरून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने दिंडीत सहभागी व्हायला.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)