डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
संपदा सोहळा, नावडे मनाला | लागला टकळा | पंढरीचा ||
जावें पंढरीसी, आवढी मनासी | कधीं एकादशी | आषाढी ये हें ||
तुका म्हणे ऐसें, आर्त ज्याचे मनीं | त्याची चक्रपाणी | वाट पाहे ||
ज्याला पंढरीची आस लागली आहे, त्या माणसाला संपत्तीबद्दल, संसाराबद्दल काहीच आसक्ती उरत नाही. त्याच्या मनात फक्त एकच आवड उरते, ती म्हणजे पंढरीला जाणे. कधी आषाढी येते आणि कधी दिंडी निघते असे त्याला वाटत असते. आणि या भक्तांचे भाग्य किती थोर ज्याच्या भेटीला ते आतुरले आहेत, तो चक्रपाणी देवही त्यांची आतुरतेने वाट पहात असतो.
ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ते आषाढ शुद्ध दशमी असा चालणारा हा पालखी सोहळा फारच अगम्य आहे. कोणाच्याही आमंत्रणांची वाट न बघता वर्षानुवर्षे येणारी ही माणसे कोणत्या ओढीने बरे येत असतील? वारीला पालखी सोहळ्याचे रूप लाभण्यापूर्वी माऊलीच्या पादुका गळ्यात बांधून नेण्याची परंपरा होती. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या घरातही ही वारीची परंपरा होती. हैबतबाबांनी १८३२ च्या सुमारास वारीला पालखी सोहळ्याचे स्वरूप दिले. पालखीचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे, अभंग, भजनांचा क्रम अशा अनेक गोष्टींची पायाभरणी करून दिली. तेव्हापासून ती वारी नियोजनबद्ध ठरल्याप्रमाणे चालू आहे. वारी मार्ग, वारीचे मुक्काम, दिवसाचे विश्राम इत्यादी सगळ्याच गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे न चुकता होत असतात.
ज्येष्ठ वद्य अष्टमीला संध्याकाळी चार वाजता माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान होते. प्रस्थान सोहळ्याला जमलेल्या सगळ्यांचे डोळे सिद्धेश्वराच्या कळसावर खिळलेले असतात. योग्य घटिका येताच सिद्धेश्वराचा कळस आनंदाने डोलून पालखीला प्रस्थानाची परवानगी देतो. अष्टमीला गुरुवार असेल तर पालखी संध्याकाळी सात वाजता प्रस्थान करते. माऊलींचा पहिला रात्रीचा मुक्काम माऊलींच्या आजोळघरी गांधीवाड्यात असतो. आजोळी जायची एक वेगळीच ओढ प्रत्येकालाच असते, आजोळाच्या ओढीने, उत्साहाने माऊली रात्री गांधीवाड्यात पोहोचते आणि आजोळी रात्रीचा मुक्काम करते.
घरचा माणूस महत्वाच्या कामासाठी निघाला की अख्खे घर त्याला सोडायला घराबाहेर पडते. इथे माऊली विठ्ठलाच्या भेटीला निघालेली आहे. केवढा मोठा हा सोहळा आहे. नवमीला सकाळी आजोळाहून प्रस्थानानंतर आळंदीकर माऊलींना धाकट्या पादुकांपर्यंत निरोप द्यायला येतात. तिथून पुढे कळसाच्या ओढयावर पालखीचे दुपारचे जेवण होते. तिथून पुढे येरवडा मार्गे भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात दोन रात्र पुणेकरांच्या सानिध्यात मुक्काम करते. तुकाराम महाराजांच्या पालखी जवळच असलेल्या नाना पेठेत निवडुंगा विठोबाच्या देवळात मुक्कामी असते. हे दोन दिवस पुणेकर आपल्या पुणेरी लौकिकाला बाजूला सारून अख्ख्या पुण्यात ‘साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा’ असा माहोल निर्माण करतात. पालख्या येण्यापूर्वी अनेक जागी रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात. ठिकठिकाणी फुलांची सजावट केलेली असते. हे दोन दिवस पुणेकर खर्चाच्या बाबतीत अजिबात हात आखडता घेत नाहीत.
आपल्या अफाट कर्तृत्वाने आभाळाएवढी ऊंची प्राप्त केलेले हे दोन महापुरुष, एकादशीच्या दिवशी एकमेकांच्या हातात हात घालून हडपसरपर्यंत एकत्र जातात. काही काळ एकत्र चालल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाकडे वळतात. तुकाराम महाराज लोणी-काळभोर मार्गे पुढे पंढरपुराकडे जातात, तर माऊली दिवे घाटातून सासवडला जाते. पुढे सगळ्याच पालख्या वाखरीला एकत्र येतात. दिवे घाटातल्या चढणीवर वर चढणाऱ्या माऊलींच्या पालखीचे आणि दिंडीचे फार विहंगम दर्शन घडते. सपाटीकडून उंचीकडे वहाणारा हा भक्तिसोहळा विलक्षण दिसत असतो. मुंग्यांसारखी वर चढणारी पांढऱ्या शुभ्र वस्त्रातली श्वेतमाला. आणि त्या श्वेतमालेवर रंगीबेरंगी पातळे नेसून चाललेल्या बायांचे रंगीबेरंगी नक्षीकाम, काय बहारदार दिसत असते. थोरल्या बंधूच्या भेटीची आस माऊलीला फार झपाट्याने घेऊन चालली असते. बंधू सोपानदेवांना भेटून दोन दिवस मनसोक्त गप्पा करण्यासाठी माऊली दोन रात्र थोरल्या बंधूंच्या जवळ सासवडात मुक्कामी रहाते.
माथ्यावर गोपीचंदनाचा टिळा आणि अबीर लावलेला वारकऱ्यांच्या देवाच्या प्रतीक्षेत, प्रत्यक्ष कऱ्हा पठारावरचा लोकदेव खंडेराय भंडाऱ्याची मूठ घेऊन उभा असतो. या दोन लोकोत्तर देवांची अनोखी भेट त्रयोदशीला जेजूरीत घडून येते. प्रपंचाच्या मोहमायेतून बाहेर पडलेला वारकरी अबिराचा टिळा लाऊन दोन्ही हातांनी भंडारा उधळतो. काय अनुपम्य सोहळा असेल तो. रात्रभर जनांचा देव, लोकदेवाच्या पायथ्याला मुक्काम करून रात्रभर भक्तीरसाने आसमंत भारून टाकतो.
वाल्या कोळयाचे रूपांतर वाल्मिक ऋषीत करणारी पवित्र भूमी म्हणजे वाल्हे. चतुर्दशीला दिंडी दुपारीच वाल्हे गावात पोहोचते. वाल्या कोळयाचे ब्रह्महत्येच्या खड्याने भरलेले सात रांजण इथेच आहेत. हे रांजण वारकऱ्याला आपल्यातले दोष खडयाप्रमाणे काढून टाका असा संदेश तर ते देत नाहीत ना? वारकऱ्यांना सन्मार्गाने चालण्याचा संदेश देत माऊलीचा रात्रीचा मुक्काम वाल्हयात होतो.
अमावास्येला निरेच्या पात्रात डोळ्यांचे पारणे फेडणारा माऊलींच्या पादुकांचा स्नानाचा सोहळा याची देही याची डोळा पहायला हजारोंच्या संख्येने भाविक येतात. अमावास्येला सकाळी पालखी लोणंदाकडे निघाल्यानंतर रस्त्यात आडव्या येणाऱ्या निरेच्या पात्रात हा पवित्र सोहळा संपन्न होतो. वारीच्या मार्गावरील लोणंद हे मोठे व्यापारी पेठेचे गाव. अमवास्येच्या रात्रीच्या मुक्कामाला पालखी लोणंदला विसावते. नोकरी निमित्ताने संपूर्ण वारी करणे अशक्य असलेले वारकरी ते बरेचसे दिंडीला इथे मिळतात. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक जमाव वाढत जातो.
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दामागे फार मोठे वलय आहे. वारीमध्ये आषाढ वद्य प्रतिपदेला पहिले उभे रिंगण होते. लोणंदातून दुपारच्या जेवणानंतर वारी तरडगावाकडे प्रस्थान करते. वाटेतल्या चांदोबाच्या लिंबापाशी लोक माऊलीच्या आगमनाची डोळ्यात तेल घालून प्रतिक्षा करत असतात. आज माऊलीचे पहिले उभे रिंगण इथे होते. मधला मार्ग अश्वासाठी मोकळा ठेऊन रस्त्याच्या दुतर्फा टाळाच्या गजरात उभ्या वारकऱ्यांच्या मधून धावणारा माऊलींचा अश्व फारच दिमाखदार दिसतो. त्याच्या दर्शनाने वारकऱ्यांना प्रत्यक्ष माऊलीच्या दर्शनाचे समाधान मिळते.
द्वितीयेचा, तृतीयेचा मुक्काम वाटेत येणाऱ्या फलटण, बरड या गावात होतो. फलटणात बंद असलेल्या विमानतळावर तर बरडला पालखी गावात असते. विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी वाटेत भेटणाऱ्या देवांना धावती का होईना पण भेट देऊन येण्याचा प्रयत्न करतात. पंचमीचा दुपारचा विसावा वारकऱ्यांना शिखर शिंगणापुरच्या महादेवाची आठवण करून देतो. शिंगणापुर फाट्यावर एस. टी. प्रशासनाने महादेवाच्या दर्शनासाठी खास बसेसची सोय केलेली असते. सकाळी दिंडी बरड मधून निघाली की चालणारे काही वारकरी बरडवरून मधल्या मार्गाने शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेऊन रात्रीच्या मुक्कामाला नातेपुतेला पोहोचतात.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)
हेही वाचा: वारकऱ्यांच्या सतत, अथक आरोग्य सेवेचा एक असाही ‘वैष्णव’ धर्म…
वारकऱ्यांच्या सतत, अथक आरोग्य सेवेचा एक असाही ‘वैष्णव’ धर्म…