मुंबईतील स्मशानभूमींमध्ये दहनासाठी लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांचे १८ लाख ६० हजार किलो लाकूड वाचणार आहे. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे पालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली आहे.
पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने सर्वस्तरिय प्रयत्न करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पालिकेद्वारे सातत्याने विविधस्तरिय कार्यवाही होत आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या आदेशांनुसार सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. या चाचपणी-अंती ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ (Agro / Tree Waste Wood) यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई महापालिकेच्या १४ पारंपरिक स्मशानभूमींमध्ये पर्यावरण पुरकतेचा भाग म्हणून लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनाचे अंतिम सत्य असल्याचे मानल्या जाणा-या दुःखद मृत्यूनंतर मानवाच्या मृतदेहाला दहन पद्धतीने निरोप देण्यासाठी मुंबई महापालिकेद्वारे स्मशानभूमी सुविधा निःशुल्क स्वरुपात देण्यात येते. या अंतर्गत पारंपरिक दहन स्मशानभूमी, विद्युत स्मशानभूमी आणि ‘पी. एन. जी.’ अर्थात ‘पाईप्ड नॅचरल गॅस’ आधारित स्मशानभूमी यांचा समावेश होतो.
पारंपरिक स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर करुन मृतदेहाला अंतिम निरोप देण्यात येतो. यानुसार प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो इतके लाकूड मुंबई पालिकेद्वारे पुरविण्यात येते. एवढे लाकूड हे सामान्यपणे २ झाडांपासून मिळते. आता पारंपरिक स्मशानभूमींपैकी १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे.
‘ब्रिकेट्स बायोमास’ हे इंधन ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ (Agro / Tree Waste Wood) यापासून तयार करण्यात येते. शेती कच-यातील जो ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो, त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात. ज्यामुळे कच-याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरण-पुरकता देखील जपली जाते.
मुंबई महापालिकेच्या ज्या १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर पहिल्या टप्प्यात करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे, त्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांना अंतिम निरोप देण्यात येतो. ही बाब लक्षात घेतल्यास या ठिकाणी वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणातील लाकडांचा वापर मृतदेह दहनासाठी होतो.
प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र, लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’ मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असते.
लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यासाठी ज्या १४ स्मशानभूमींची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये ‘डी’ विभागातील मंगलवाडी स्मशानभूमी, ‘ई’ विभागातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ‘एफ उत्तर’ विभागातील गोयारी हिंदू स्मशानभूमी, ‘जी उत्तर’ विभागातील धारावी हिंदू स्मशानभूमी, ‘एच पश्चिम’ विभागातील खारदांडा हिंदू स्मशानभूमी, ‘के पश्चिम’ विभागातील वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, ‘पी उत्तर’ विभागातील मढ हिंदू स्मशानभूमी, ‘आर दक्षिण’ विभागातील वडारपाडा हिंदू स्मशानभूमी, ‘आर उत्तर’ विभागातील दहिसर हिंदू स्मशानभूमी, ‘एल’ विभागातील चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी, ‘एम पूर्व’ विभागातील चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, ‘एम पश्चिम’ विभागातील आणिक गाव हिंदू स्मशानभूमी, ‘एस’ विभागातील भांडुप गुजराती सेवामंडळ स्मशानभूमी आणि ‘टी’ विभागातील मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी अशा १४ स्मशानभूमींचा समावेश आहे.
..
१४ स्मशानभूमींमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी सांगितले .