मुक्तपीठ टीम
उम्मुल खेरचं जीवन म्हणजे संघर्षातून परिश्रमाने यश मिळवता येते हे दाखवून देणारे आहे. प्रेरणादायी असे. ती आयएएस झाली तेव्हा तिच्या संघर्षमयी यशोगाथेविषयी खूप चर्चा झाली. पुढे आता तिच्या कर्तृत्वाला प्रशासकीय सेवेतून नवनवे धुमारे फुटू लागले आहेत. ज्या परिस्थितीतून ती आली त्याची जाण ठेवत ती प्रशासकीय सेवेतही सेवाभाव जपणार याची सर्वांना खात्री आहे.
उम्मुल खेर मूळची राजस्थानातील पाली येथील आहे. काही वर्षांपूर्वी तिचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. ती दिल्लीच्या निजामुद्दीन येथील झोपडपट्टी भागात राहत होती. उम्मूलचे वडील रस्त्याच्या कडेला हातगाडीवर सामान विकत असत. २००१ मध्ये दिल्लीच्या निजामुद्दीनमधील झोपडपट्ट्या काढून टाकण्यात आल्या. अशा स्थितीत त्यांना घर सोडावे लागले. दिल्लीच्या त्रिलोकपुरी येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यावेळी उम्मुल खेर सातवीत शिकत होती.
त्रिलोकपुरीत आल्यानंतर थोड्याच दिवसात वडिलांचे कामदेखील सुटले, म्हणून उम्मुलने मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. स्वतःच्या अभ्यासाबरोबरच कुटुंबाचेही खर्च उचलण्यास सुरवात केली. उम्मुल खेरचा सामना केवळ गरीबीशीच नव्हता तर ती स्वतः जन्मजात बोन फ्रॅक्टल आजाराने जन्मत:च ग्रस्त आहे. या आजारामुळे, उम्मुलच्या शरीरातील हाडे अत्यंत नाजूक होती. तीची हाडे १६ वेळा फॅक्चर झाली आणि ८ वेळा ऑपरेशन करावे लागले. तरीही तिने जिद्द सोडली नाही. तिने आयएएस होण्याचे स्वप्न साकारले. तिचा सर्वत्र गौरव झाला. आता ती सेवाभावातून समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न करतेय. तिच्या जिद्दीला मुक्तपीठच्या शुभेच्छा!
उम्मुलसाठी संघर्ष हाच होता स्थायीभाव
• उम्मुलला जन्मत: असणाऱ्या हाडांच्या आजारामुळे रोजचे जगणेही सोपे नव्हते.
• त्यात घरचे अठारविश्व दारिद्र्य, त्यात वडिल बेरोजगार झाल्याने भर पडली.
• ती शिक्षण घेत असताना तिच्या आईचे निधन झाले आणि त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले तेव्हा उम्मुलच्या आयुष्यात दु: खाचा डोंगर कोसळला.
• त्रिलोकपुरी येथे भाड्याच्या घरात राहू लागली आणि मुलांचे क्लास घेऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
• दहावीमध्ये ९१ आणि बारावीत ९० टक्के निकाल लागला.
• त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली. तिने जेएनयूमधून पीजीची पदवी घेतली.
• एमफिलनंतर उम्मुलने जेआरएफही उत्तीर्ण केली.
• २०१४ मध्ये जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रामसाठी उम्मुलची निवड झाली.
• १८ वर्षांच्या इतिहासात या कार्यक्रमासाठी फक्त चारच भारतीयांची निवड झाली होती आणि उम्मुल त्यापैकी एक आहे.
• उम्मुल पहिल्या प्रयत्नात ४२० व्या क्रमांकासह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला भारतीय महसूल सेवेत जाण्याची संधी मिळाली.
• सध्या उम्मुल सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
पाहा व्हिडीओ: