मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना फोन करून मुंबईत लोकल सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. दरेकरांनी लोकल सर्वांसाठी चालू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. मुख्यमंत्र्यांनी उपनगरीय व कसारा-कर्जत-ठाणे-मुंबई लोकल सेवा सुरू करण्या संदर्भात दूरध्वनीवरून तपशीलवार चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरेंनी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
मुंबईचा पॉझिटीव्हिटी दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी तातडीने लोकल सुरू करावी. कल्याण-डोंबिवलीहून खाजगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हित लक्षात घेत कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची अनुमती देण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यांसदर्भात पत्र पाठवून लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.
दरेकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, कोरोना प्रादुर्भाव वाढु नये याकरीता जलद गतीने लसीकरण करण्यास भर दिला गेला. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये शहरांमधील निर्बंध कमी करण्यात आले. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वे, मेट्रो, ट्राम इत्यादी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. वाहतुकीची ही साधने या शहरांसाठी व तेथील नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहेत, तशीच मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. कोरोनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नोकरी- व्यवसायाला जाणे अवघड झाले आहे, परिणामी जीवन कसे जगायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे अशी खंत दरेकर यांनी पत्राव्दारे व्यक्त केली.
कल्याण परिसरातून उपजिविकेसाठी मुंबईला दरदिवशी प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत. उपनगरीय लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद असल्यामुळे त्या नागरिकांना रस्ते मार्गाने कामावर जाण्या-येण्यास सुमारे ४ ते ५ तास प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे कल्याणकर हैराण झाले आहेत. कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आर्थिक परिस्थिती कोलमोडली आहे, असल्याचे दरेकर यांनी पत्र्याव्दारे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणुन दिले.
त्यामुळे कर्जत कसारा पासून ते सीएसटी पर्यंत तसेच डहाणू पासून ते चर्चगेट पर्यंत आणि पनवेल पासून ते सीएसटी पर्यंत ज्या नागरिकांचे लसीचे दोन डोस झाले आहेत, अशा सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात यावी तसेच ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करण्याची अनुमती आहे त्याचप्रमाणे ज्या खाजगी कर्मचा-यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाही लोकलमधून प्रवासाची अनुमती मिळावी अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.