मुक्तपीठ टीम
कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्याच्या निमित्तानं होणारी कांद्याची आयात शेतकऱ्यांचाच नाही तर खवैया ग्राहकांचाही वांधा करीत आहे. नाफेडचा कांदा वाशीतील कांदा बाजारात पाठवला जात आहे. काही व्यापाऱ्यांनी नफा कमावण्यासाठी इराणपाठोपाठ आता तुर्कस्तानमधून कांदा आयात केला आहे. तुर्की कांदा १५ ते २१ रुपये किलोने मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. कांदा बाजारभाव सध्या स्थिरावले असले तरी उन्हाळी कांद्याला जो भाव मिळायला पाहिजे, तो मिळत नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मुक्तपीठशी बोलताना सांगितले. तसेच कांदा चवीसाठी ओळखला जातो. मात्र, आयात केलेला कांदा हा बेचव असल्याने खवैया ग्राहकांचीही एकप्रकारे फसवणूक होत असल्याचेही ते म्हणालेत. हॉटेल व्यावसायिक कमी किंमतीमुळे परदेशी कांद्याला पसंती देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. पण ग्राहकांचेही एकप्रकारे नुकसानच होते.
वाशीतील बटाटा-कांदा बाजारात महिनाभरापूर्वी कांद्याचा भाव ३५ रुपये किलोच्या पुढे होता. हे पाहता, घाऊक भाव ४० रुपये प्रति किलोच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. ही बाब लक्षात घेऊन घाऊक व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी नफा कमावण्याच्या उद्देशाने इराणमधून ४८० टन कांदा आयात केला होता, त्याची २० ते ३० रुपये किलोने मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
आता तुर्कस्तानातून कांदा आयात करण्यात आला आहे. देशी-विदेशी कांद्याची आवक वाढल्याने भावात सातत्याने घसरण होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सर्वात कमी दर्जाचा देशी कांदा ३ रुपये प्रति किलो, तर इराणचा सौम्य दर्जाचा कांदा ५ रुपये किलो दराने विकला गेला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.