तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
नाशिकमधील वोखार्ट रुग्णालयात मंगळवार हा गांधिगिरीचा दिवस होता. आपचे नेते समाजसेवक जितेंद्र भावे यांनी अंगावरील कपडे काढत आंदोलन केले. कारण अमोल जाधव या तरुणाच्या घरातील चौघांचा मृत्यू ओढवला. मात्र, त्यानंतरही त्या तरुणाने डिपॉझिट म्हणून भरलेले दीड लाख रुपये परत दिले जात नसल्यानं भावे तिथे पोहचले. त्यांनी अंगावरील कपडे काढून तिथं ठिय्या दिला. त्यांच्यासोबत तो तक्रारदार तरुणही होता. भावेंच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तिथे नाशिककरही मोठ्या संख्येनं पोहतचले.
जितेंद्र भावे यांनी तिथं केलेलं आंदोलन हे फेसबूकवर लाइव्ह दाखवलं. त्यात ते त्या तक्रारदार तरुणासोबत दिसत आहेत. खासगी रुग्णालयात बहुधा मस्तवाल वागणारे काही अधिकारी कर्मचारी असतातच असतात. नव्हे गुणवत्तेचा तोच निकष मानला जात असावा, असा संशय घ्यावा, अशी परिस्थिती आहे. मग ती रुग्णालयं मुंबईतील असो वा देशातील कुठचीही. नाशिकच्या वोखार्टमध्येही यादव नावाचा कुणीतरी होता. त्या अधिकाऱ्याने बहुधा त्या तक्रारदार तरुणाला उद्दामपणे दुरुत्तरे दिलीत. त्यातून वाद वाढला. जितेंद्र भावे तिथं पोहचले. त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. रुग्णाचे प्रवेशाच्यावेळी घेतलेले डिपॉझिट परत केले पाहिजे , हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण ऐकलं गेलं नाही. मग मात्र भावेंनी अंगावरील एकेक कपडा काढला. तरीही ऐकलं नाही, तेव्हा उरलेली चड्डीही काढण्याची धमकी दिली. तुम्ही माझे कपडे विका आणि पैसे घ्या. असे ते बजावत होते. भावेंनी फक्त चड्डीवर तिथंच ठिय्या दिला. फेसबुकवर हे सर्व लाइव्ह गेलं. लाखोंनी ते पाहिलं. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. संध्याकाळी तर हजारो नाशिककर रुग्णालय परिसरात जमू लागले आणि मग प्रतिमा धोक्यात येत असल्याचं लक्षात येताच मस्तवालपणा सहकार्यात बदलला. भावेंची गांधिगिरी यशस्वी ठरली. रुग्णालयाने त्या गरीब तरुणाला डिपॉझिटचे एक लाख चाळीस हजार परत देण्याचे मान्य केले.
ही पहिली घटना नाही. जिथं रुग्णालयाविरोधात असा प्रक्षोभ उसळला. पण दुर्दैवाने काही लोक विनाकारण लक्ष्य करतात ते सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना. बक्कळ फायदा कमावणारे व्यवस्थापन बाजूलाच राहते. रुग्णालयांमध्ये सर्वात हमखास रिटर्न देणारी गुंतवणूक म्हणून पाहणारे आणि मार्जिन वाढतंच राहावं यासाठी बिलिंगची जिझिया वसुली करणारे बाजूलाच राहतात. हे देशभर चालतं. त्यातही आता मेडिक्लेममुळे रुग्णालयांविरोधात कुणी बोलत नाही. बिलातील अवास्तव आकारणी दुर्लक्षित राहते. त्यामुळे अधिकच फावतं. नाशिकमध्ये डिपॉझिटवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यानं उघडकीस आलं. त्यात पुन्हा जितेंद्र भावेंसारखा लढवय्या तिथं पोहचल्यानं न्याय मिळाला.
नाशिकमध्ये जे घडलं ते मुंबई ते नागपूर कुठेही घडते. रुग्णांकडून अवास्तव वसुली केली जाते. आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर युनियनच्या नावाखाली पोसलेले काही किंवा स्थानिक राजकीय नेत्यांचे हस्तक रुग्णांच्या नातेवाईकांनाच धमकावतात. अरेरावी तर नित्याचीच असते.
आज हे लिहित असतानाच औरंगाबादची बातमी पुढे आली. सव्वा लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप झालेल्या औरंगाबादमधील ममता रुग्णालयावर कारवाई झाली आहे. तक्रारीनंतर अवघ्या १८ तासांत रुग्णालयाची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे. बजाजनगर परिसरातील ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द झाल्याने त्यांना आता नव्या रुग्णांना दाखल करता येणार नाही. तिथे रुग्ण न्याय हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चौकशी समिती नेमली. अहवाल येताच तात्काळ कारवाई केली.
आज महाराष्ट्राला गरज आहे ती अशा जितेंद्र भावेंसारखे लढाऊ समाजसेवकांची. फक्त त्यांनी गांधिगिरीनेच आंदोलन करावे. तसेच सुनील चव्हाणांसारख्या अधिकाऱ्यांची. अशी माणसं असतील तर वैद्यकीय क्षेत्रात वाढलेला अपप्रवृत्तींचा विषाणू वेळीच नियंत्रणात येईल. हे खूप महत्वाचे आहे. कारण कोरोनाचा विषाणूही संपू शकतो, पण वेळीच उपचार नाही केले तर हा अपप्रवृत्तींचा विषाणू फोफावतच राहतो!
हेही पाहा: https://m.facebook.com/story.php?story_fbid=3308780169224473&id=100002775666595
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)