तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
खरंतर सकाळपासून मुंबईबाहेर आहे. जिथं आहे तिथं जियोसोडून कसलंही नेटवर्क नाही. डिजिटल इंडिया म्हटलं तरीही तोही इंडिया भारत असा भेदभाव करतोच. त्याच्यावर पुन्हा कधीतरी. त्यामुळे दुपारी झालेली सरळस्पष्ट चर्चा एवढ्या उशिरा मांडावी लागत आहे.
सुरुवातच भाजपाविरोधातून झाली असं भाजपा समर्थकांना वाटू शकतं. पण जिथं चांगलं तिथं चांगलंच आणि जिथं वाईट तिथं वाईटचं म्हणायचं, हार जसे अर्पण करायचे तसेच प्रहारही करायचे हे मुक्तपीठचं धोरण आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंडसाठीचं प्रचार भाषण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात ठेऊन केलेले हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोरोना पसरण्याविषयी जो मुद्दा तयार केला त्यावरून दिसून येत आहे. कोणी कितीही मुरब्बी असलं तरी हिडन अजेंडा आजकाल हिडन राहत नसतो. तरीही ते भाषण चाललं असतं. कारण सरळस्पष्ट चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक म्हणाले तसे राजकारण होत असतं. मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करणंही स्वाभाविकच आहे. मात्र, त्यांना तो महा विकास आघाडीचा अपमान वाटतो. महाराष्ट्राचा नाही.
भाषण खटकणारंच, कारण पंतप्रधानांचं होतं, फक्त भाजपा नेते नरेंद्र मोदींचं नव्हतं!
देशाच्या संसदेत केलेलं ते भाषण आहे. तेही एखाद्या भाजपा नेत्यांने नाही. त्याने जर महाराष्ट्राचा असा अपमान केला असता तर त्याला आणखीच शेलक्या भाषेत सुनावणंही चुकीचं म्हणता आलं नसतं. पण नरेंद्र मोदी हे फक्त भाजपा नेते नाहीत, त्यांच्यावर टीका होते तसे ते फक्त भाजपाचे प्रधान प्रचारक नाहीत, तर देशाचे पंतप्रधानही आहेत. त्यांचं बोलणं, त्यांचे अनेक निर्णय यामुळे अनेकदा माझ्यासारख्यालाही ते देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरात आणि उत्तरप्रदेश या द्विभाषिकाचे किंवा जिथं निवडणूक असते त्या राज्यांपुरतेच मर्यादित पंतप्रधान वाटतात. म्हणजे महाराष्ट्रातील मोठमोठे नेते जरी दिल्लीत गेले तरी त्यांचं राज्यातील सत्तेत मन गुंतलेलं राहतं, किंवा खासदारांचं संसदेपेक्षा जिप, मनपा कारभारावर लक्ष राहतं तसंच त्यांचं वाटतं. तसं असू नये.
महाराष्ट्र वाहतो देशाचा बोजा!
महाराष्ट्र हा देशाचा बोजा वाहत आला आहे. त्याला कुणाचा बोजा होत नसतो. त्यामुळेच सामान्यातील सामान्य भारतीय हक्कानं त्याच्या देशाच्या आर्थिक राजधानीत येतो तेव्हा इथं त्याचा इतर राज्यांप्रमाणे छळ होतं नाही. दिल्लीत बिहारी कष्टकऱ्यांना अपशब्द वापरून ये बिहाडी संबोधतात. पंजाबात कसं वागवतात ते बिहारी नेतेच अनेकदा सांगतात. आसाममध्ये काही वर्षांपूर्वी उत्तरभारतीयांच्या वस्त्या जाळण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात मनसेनं फक्त एक टॅक्सी फोडली तर तीच क्लिप दिवसभर लूपमध्ये टाकत मराठी माणसांनी जणू उत्तर भारतीयांना संपवल्याचा कांगावा केला गेला.
मजुरांची कामाची, महाराष्ट्राची श्रमाची गरज!
महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं स्थानिक असो की उपरे एकाचाही कोरोना संकटात भुकेनं मृत्यू झाला नाही. मजूर आम्ही संकटात होतो तेव्हा पळून गेले आणि चांगले दिवस आले तर परतले, असं कुणीच त्यांना नंतरही हिणवलं नाही. कारण त्यांना जशी कामाची गरज तशीच महाराष्ट्रालाही त्यांच्या श्रमाची गरज, हे मराठी माणूस ओळखून असतो.
पंतप्रधान म्हणाले तसे त्यांनीही पक्षीय राजकारणापासून वर झेपावण्याची गरज!
त्यामुळे पंतप्रधानपदावरी व्यक्तीने तरी किमान एखाद्या राज्यासाठी अपमानास्पद ठरतील असे शब्द वापरू नयेत. त्यांच्याच भाषणातील शब्दाच सांगायचे तर “कभी तो दलगत राजनीति से उपर उठना चाहिए”
पण देशाचा विचार करून पक्षीय राजकारणातून वर झेपावणं त्यांना आणि त्यांच्या इतर भाजपा नेत्यांनाही जमत नाही. त्यामुळे काय कोणाकडून अपेक्षा ठेवणार?
( तुळशीदास भोईटे मुक्तपीठ मुक्तमाध्यमाचे संपादक आहेत.)
संपर्क – ९८३३७९४९६१ ट्विटर @TulsidasBhoite
चर्चेत सहभागी इतर मान्यवरांच्या भूमिका थोडक्यात:
गिरीश अवघडे
पुण्यातून चर्चेत सहभागी गिरीष अवघडे यांनी कोरोना लाट आल्यापासूनच मोदी सरकारचे कसे चुकले ते मांडत ट्रम्प यांचा भारतातून केलेला प्रचाराचा शुभारंभ वगैरेचा उल्लेख करत केंद्र सरकारच कसं जबाबदार ते मांडलं. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे भाषण कसे करु शकते असा प्रश्न विचारत त्यांनी महाराष्ट्राचा अपमानच झाल्याचे बजावले.
अॅड. जयेश वाणी
अॅड जयेश वाणी यांनी कोरोना संकटात मुंबई महाराष्ट्रानं बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करत भाजपाने त्यावेळी जे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केले. आघाडी सरकारविरोधात कसे राजकारण केले, त्याची आठवण करून देत पंतप्रधानांनी मुळात संघराज्यभावनेचाच घात केल्याचे म्हटले. त्यांनी भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या या अपमानाबद्दलही भूमिका मांडण्यास सांगितले.