तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘आजी-माजी-भावी…’ विधानामुळे गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा किमान माध्यमांमध्ये तरी खळबळ माजली आहे. त्यात आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी नेतृत्वाच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांवरील नाराजीच्या बातम्या आल्या. स्वाभाविकच बातमी आणखी मोठी होऊ लागली. त्यात पुन्हा भाजपाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियांची फोडणी मिळाल्याने चर्चा अधिकच रंगतदार झाली. आता त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की ‘आजी-माजी-भावी…’ विधान करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं दडलंय काय? त्यांच्या मनात काय दडलंय हे त्यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे आणि नुकताच तिरुपती विश्वस्तपदाचा प्रसाद ज्यांना मिळाला, ते शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही सांगू शकत नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे यावर लिहिणे म्हणजे फक्त अंदाज बांधणेच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलले होते?
- “मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील जाहीर कार्यक्रमात केलं होतं.
- त्याबद्दल विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी केलेले विधानही भुवया उंचावणारे ठरले.
- “अर्थ तोच होता, आजी-माजी सहकारी तिथे होते आणि उद्या कोणी एकत्र आले तर भावी होऊ शकतात. सगळे म्हणजे येणारा काळच काय ते ठरवेल!”
माध्यमातील सुत्रांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाराज
- मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या.
- शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले, तेथे तासभर चर्चा झाली, पण बाहेर काही सांगण्यास त्यांनी नकार दिल्याने गूढ पुन्हा वाढले. खरंतर राऊतांनी भाजपावर कोरडे ओढत मुख्यमंत्र्यांचे विधान तसे नसल्याचे आधीच स्पष्ट करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
हे सारं सुरु असताना स्वाभाविकच जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानामागे नेमकं काय दडलंय त्याचा वेध घेणे थेट शक्य नाही. शिवसेना म्हणजे एक घाव दोन तुकडे, शिवसेना म्हणजे रोखठोक भूमिका असे सर्व सांगितले जात असले, मानले जात असले, तसेच ते बँडिंगसाठी सर्व ठिक असले तरी तसंच असते, आणि नेहमी तसेच असते असे नाही. बाबा रामदेवांनी सांगितले म्हणून काही पतंजलीचे कोरोनिल औषधं कोरोनावर गुणकारी असतंच असं नाही, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिमा आणि प्रत्यक्षातील प्रतिभांचे असते.
त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले की एक साधा माणूस. (त्यांच्या कोरोना संकटातील आपुलकीच्या संवादाची भाजपाने आणि खासगीत सोबतच्यांनीही थट्टा केली असली तरी त्यामुळे घरोघरी आपला माणूस अशी प्रतिमा तयार झाली, हे नाकारता येत नाही.) उद्धव ठाकरे म्हणजे फार राजकारण्यांचे छक्के-पंजे न समजाणारा नेता. १९९७च्या किणी प्रकरणात राज ठाकरे वादग्रस्त ठरल्यानंतर पर्याय म्हणून बाळासाहेबांनी राजकारणात लाँच करेपर्यंत काहीसा बाजूला अनभिज्ञ असलेला. फारतर २४ वर्षांचा राजकीय अनुभवी असे मानले जाते. पण त्यांचे राजकीय वय कमी असले तरी मला त्यांच्या शैलीत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोघांचे मिश्रण दिसते. दोन नेत्यांचे काही पैलू घेऊन एक उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात. त्यामुळे बाळासाहेब जे बोलायचे तेच करायचे असे मानले जायचे असे मानले जायचे, तसे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलता येत नाही. ते न बोलता जे करून दाखवतात ते त्यांना पाहिजे असतं तेच, असंही त्यांना ओळखण्याचा दावा करणारे सांगतात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या सध्याच्या विधानांकडेही तसेच पाहिले पाहिजे.
उद्धव ठाकरेंचे जाहीर विधान म्हणजे उगाचच केलेला विनोद नव्हता. तो त्यांचा स्वभाव नाही. ते विनोद करतात. नाही असे नाही. पण करायचा म्हणून केवळ टाळ्यांसाठी करणारे ते वक्ते नेते नाहीत. ते ठरवूनच बोलतात. त्यामुळे “मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात कुणाला तरी काही तरी संदेश देण्याचा उद्देश असलाच तर आश्चर्य वाटायला नको. तो कुणाला आणि का असू शकतो?
सत्तेची मजबुरी, आघाडीची मजबुती, पण…
अनेकदा राजकीय विश्लेषण करताना मोठ्या पटलावर अनेक छोट्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. त्यात आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील अंतर्गत वादाचे मुद्दे बातमीपुरते चघळून नंतर विसरवले जातात. खरंतर युती आघाडीत वेगवेगळे लढताना बहुसंख्य जागी एकमेकांसमोरच लढलेल्या आणि त्यामुळे त्या मतदारसंघांमध्येच जास्तीत जास्त प्रभाव क्षेत्र तयार झालेल्या या दोन पक्षांमध्ये स्थानिक कुरबुरी असणारच. निवडणुकीच्या वेळी त्या खूप उफाळणार हेही नाकारता येत नाही. सत्तेच्या मजबुरीतून आघाडीची मजबुतीचे गणित मांडले जात असले तरी स्थानिक पातळीवरील सत्तेचे अनेक बिंदू जुळल्यानंतरच राज्यातील मोठे सत्ताचित्र तयार होते, हे विसरून चालता येणार नाही.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचे जिव्हारी लागणारे विधान!
स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्षाचे एक मोठे उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेडचे. तेथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते विरुद्ध शिवसेना उघड संघर्ष भडकला आहे. मोहितेंनी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य फोडून राष्ट्रवादीची सत्ता आणली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीशी सर्वात चांगले संबंध असणाऱ्या खासदार संजय राऊतांना तिथं पाठवले. त्यांनी प्रथमच राष्ट्रवादीला थेट आवाज दिला. मोहितेंना पुढच्या निवडणुकीत पाडण्याची प्रतिज्ञाही केली. पण काहीच उपयोग झाला नाही. मोहितेंनी काही जुमानले नाही आणि शिवसेनेला पाडून दाखवले!
तेवढ्यावर हे प्रकरण शांत झाले नाही. पुढे माध्यमात आलेल्या बातम्या अधिक धक्कादायक होत्या. आमदार मोहिते म्हणाले, शिवसेनेने ठरवावे सत्तेत राहायचे की नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपा करते तेच काही न करण्याचे आरोप त्यांनी केले. आणि फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांनी आघाडीच्या कारभाराचे श्रेय दिले. त्यांचे बोलणे शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागावे असेच होते.
अर्थात केवळ त्यामुळे नाही तर अनेकदा आघाडीतील काही नेत्यांच्या वागणेही उद्धव ठाकरे केवळ नामधारी मुख्यमंत्री आणि खरी सत्ता आम्हीच राबवतो, असे सुचवणारे दिसते. तेही मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर राज्यातील क्रमांक दोनच्या पक्षाचा प्रमुख म्हणूनही उद्धव ठाकरेंना खुपणारेही असावेच.
‘आजी-माजी-भावी…’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संदेश देण्याचा प्रयत्न?
‘आजी-माजी-भावी…’ सहकारी असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ करायचे म्हणून केले, असे मानणे म्हणजे मुंबई बँकेप्रकरणी कसल्याही कारवाईची भीती नसतानाही प्रवीण दरेकरांनी केवळ वैचारिक बांधिलकीतून भाजपाची वाट धरली, असे मानण्यासारखे होईल! राजकारणी जे करतात त्यामागे काही तरी हेतू असतोच असतो. नेमका हेतू काय ते कधी तरी उघड होईलच असेही नसते. हेतू साध्य झाला तर तो तसे काही घडेलच असेही नसते. जसे अण्णा हजारेंनी अनेक ‘आमरण’ उपोषणांचा इशारे देऊन फक्त मोठा नेता येऊन माध्यमांसमोर चमकवून गेला की ते मागे घ्यायचे, तसेच!
बहुधा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आघाडी मित्रांना सांगायचे असावे की सत्ता ही फक्त माझी गरज नाही. जसे तुमच्याकडे पर्याय आहेत, तसे माझ्याकडेही आहेत. मी सत्ता सोडून आलो आणि सत्ता मिळवली. तुम्हाला सत्ता नसताना सत्ता मिळाली. तुम्ही जसे तिथं जाऊ शकता, तसे मलाही अशक्य नाही. अर्थात हा फक्त अंदाज असावा. पण पुणे ते नागपूर असे शिवसेनेची राष्ट्रवादीकडून होणारी वजाबाकी लक्षात घेतली की एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच नसेल असे सांगता येत नाही.
अर्थात नेमकं काय घडेल ते साक्षात कुणी नेताही कधी सांगत नाही. जे बोलायचं तेच उगाचच बोलायचं नसतं. जे करायचं ते आधीच उघड करायचं नसतं. असं सर्वच राजकीय नेते करतात. जे बोलतात ते करत नाहीत, जे करतात, ते कधीच बोलत नाहीत, असं सांगत नाव एखाद्याच नेत्याचं खराब केलं जातं. पण राजकारण असतंच तसं! आणि अर्थातच राजकारणीही!!