तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
नबाव मलिकांनी शेलारांचा मौलानांसोबतचा फोटो दाखवत आरोप केल्यानंतर आशिष शेलारांनी दिलेले उत्तर बोलके आहे. फोटो फक्त एकाचे नसतात. सर्वांचेच असतात. कधी ना कधी कुठे ना कुठे असे फोटो निघतात. यात कुणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न नाही. उलट जाहीररीत्याही प्रत्येकाने अशा फोटोबाजीपासून सावध राहिलं पाहिजे. मग ते जुने असो वा नवे. कधी ना कधी चुकींच्यासोबत असतील तर वापरले जाऊ शकतील, याचं भान ठेवलंच पाहिजे. पण त्याचबरोबर प्रत्येकाने काही गोष्टी या लक्षात घेतल्याच पाहिजेत. राजकारणात, समाजकारणात अनेकदा मोठ्या व्यक्तींना अनेकदा अनेक ठिकाणी इच्छा असो नसो जावे लागते. काहीवेळा अशा ठिकाणी येणाऱ्या व्यक्ती या अपरिचितही असतात. किंवा काहीवेळा माहित नसूनही नको त्या व्यक्ती लगट करून फोटोची संधी साधतात. त्यामुळे फक्त फोटोवरून कुणावर अपप्रवृत्तींशी किंवा नको त्यांच्याशी संबंध जोडणे हे १००% विश्वसनीय मानले जाऊ शकत नाही.
सध्याच्या वेगवान माध्यम काळात पुन्हा एकदा असे फोटो दाखवून धुरळा उडवून देण्याचं राजकारण सुरु झालं हे. हे आजचं नाही. किमान आता माध्यमं वेगवान झाल्यामुळे खुलासाही वेगवान गतीनं करता येतं. पूर्वी तर निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एखादा फोटो येत असे आणि खुलासा येईपर्यंत निवडणुकीचा निकाल हा ज्याच्यावर आरोप होत असे त्याचा निकाल लावणारा ठरत असे. आता खुलासाही वेगानं येत आहे. तरीही एका वर्गात चुकीचा संदेश जातोच जातो. त्यामुळे ‘फोटोकारण’ सुरुच राहतं. आता पुन्हा तेच सुरु झालं आहे. अर्थात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोटोकारण सुरु असले तरी भाजपाही त्यात मागे नाही. पण हे एकालाच बाधेल असे नाही. सर्वांनाच बाधणारं ठरु शकतं.
अनेकदा असे फोटो प्रत्यक्षातील नसून सॉफ्टवेअरचा वापर करूनही तयार केलेले असू शकतात. तसेच व्हिडीओच्याबाबतीतही घडू शकते. सॉफ्टवेअरमुळे एवढं सारं करता येतं की खरं काय आणि खोटं काय याबाबत संभ्रम निर्माण करणं शक्य झालं आहे. त्यातही डीप फेक व्हीडीओ तर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्दही बदलू शकतात. खूप प्रयत्नपूर्वकच लक्षात येऊ शकतं की व्हिडीओ खरा आहे की खोटा!
त्यामुळे राजकीय सामाजिक एकंदरीतच सार्वजनिक जीवनातच नाही तर वैयक्तिक खासगी जीवनातही प्रत्येकानं हे टाळलं पाहिजे. केवळ फोटो समोर आला, व्हिडीओ आला तर लगेच विश्वास ठेवणे बंद करून त्याची शहानिशा केली पाहिजे. राजकीय नेते आरोप करतात, त्यामुळे माध्यमांना दाखवावे लागते. नाइलाज असतो. पण किमान ते आरोप कोणाचे त्याचा उल्लेख करतच चालवतात. अनेदा सोशल मीडियावर जणू आपलाच शोध या आवेशात काही पोस्ट फिरतात. तसेच काहीवेळा माध्यमांच्या नावाने बनावट तयार करून फिरवल्या जातात. हे सारं लक्षात ठेऊनच आपल्या सर्वांनाच आता जगावं लागणार आहे. हे टाळता येणार नाही. पण किमान सजग राहून फसण्याचा धोका मात्र टाळता येईल.
आमदार आशिष शेलारांच्या बोलण्यात काहींना धमकावण्याचा सूर वाटू शकेल. पण तुमच्याकडे आमचे फोटो आहेत, तसेच आमच्याकडे तुमचे आहेत, हे सारं लक्षात ठेऊन अण्वस्त्रधारी राष्ट्र जबाबदारीनं वागतात तसे आता प्रत्येकालाच जबाबदारीने वागावं लागणार आहे. नाहीतर एखादा चुकीचा आरोप कुणाचंही राजकीयच नाही तर खासगी जीवनही उध्वस्त करू शकेल.
अर्थात राजकारणात एवढं पथ्य पाळणं शक्य होतंच असं नाही. मुद्दामही तसं घडवलं-बिघडवलं जातं. पण किमान आपण आपल्या ‘यूजर’ म्हणजे वाचक-प्रेक्षकाच्या पातळीवर अशा गोष्टींवर थेट विश्वास न ठेवता सजगतेनं वागलं पाहिजे. म्हणजे किमान आपल्याला वापरून घेणं इतरांना शक्य होणार नाही. आणि नंतर मग कुणीतरी फसवलं, अशी रुखरुख मनाला बोचणार नाही. हेच खासगी जीवनासाठी तर जरा जास्तच महत्वाचं!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite