तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
म्हाडा भरतीसाठी असलेली परीक्षा शनिवारी रात्री रद्द करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओही पोस्ट केला. पण सुशिक्षित बेरोजगार परिक्षार्थी हे गेली काही वर्षे अक्षरश: मेताकुटीला आले आहेत. सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षा हा त्यांच्यासाठी सध्यातरी चांगलं जीवन जगण्यासाठीचा, आपल्या कुटुंबाचं जीवन सावरण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. आधी तर भरतीच केली जात नाही आणि केली तर असे अचानक रद्दचे अडथळे येत राहतात. आज सकाळपासून अनेक विद्यार्थ्यांशी बोलत होतो. काहींनी माझ्या जुन्या ट्वीटची आठवण करून दिली. उमेदवारीच नाकारली गेली, लढण्याची संधीच नाकारली तर राजकारण्यांना कसं वाटेल ते विचारणाऱ्या. त्यांचं म्हणणं होतं, “त्या आमच्या मनातीलच भावना. विचारा आता पुन्हा. दिवसा उमेदवारी जाहीर झाली, आणि रात्री रद्द झाली…तर तुम्हाला कसे वाटेल?”
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
परिक्षार्थींच्या मनातील तीव्र भावना मांडणारे एक पत्र एका तरुण मित्राने पाठवले, ते त्याच्याच शब्दात वाचा:
आज १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या म्हाडा विभागाची विविध पदांची होणारी परीक्षा अचानक पुढे टकलण्यात आली. मुळातच याचे सर्व नियोजन होत असताना परीक्षार्थींना सगळ्याच बाबतीत राजकीय मंडळी गृहित धरतातच कसे ?
एकीकडे एसटीचा संप असल्याने परीक्षा देण्यासाठी आमचे बांधव मिळेल त्या वाहनाने साधनाने आपला प्रवास २ दिवस आधी सुरु करत असतात. त्यातील जवळपास सर्वच बांधव एक दिवस आधीच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचत असतात. तशी सूचनाच आपण प्रवेश पत्रात दिली होती. दूर कुठून तरी, कसा तरी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून आमचे बांधव परीक्षा दयायला पोहले. आणि पेपर रद्द झाला ! यासारखे दुसरे दुःख कोणते?
कोणत्या परिस्थितीत रस्त्याच्याकडेला राहून रात्र काढतो ते आमचे आम्हांलाच माहित. लॉज करून राहण्या इतके पैसे नसतात आमच्या बांधवांकडे! परीक्षा दयायलाच मुळात पैसे उसनवार, कर्ज किंवा वस्तू गहाण ठेवून आलेले असतात.
याआधी सुद्धा आरोग्य भरतीबाबत झालेला गोंधळ माहिती असनाला सुद्धा आपण त्यातून काहीच कसं काय शिकलो नाही? याचे नवल वाटते विदयार्थ्यांना माहिती असते की सदर काळ्या यादीतील कंपनीला परीक्षेचे कंत्राट देवू नये, तरी कसल्या हट्हासापायी आमच्या बांधवांच्या भावना जाणून दुर्लक्षित केल्या जातात?
आधीच कोरोनाच्या काळात २ वर्षात सर्व गणित बिघडले आणि आता हे असं? तर आम्ही कोणाकडे पाहावं बरे ? जो-तो आपले राजकारण करण्यात व्यस्त आहे. पण सुशिक्षित बेरोजगारांच्या भावना समजून घेणार कोण? याचा जर उद्रेक झाला तर याला जबाबदार कोण?
गेल्या वर्षभरापासून परीक्षा ऐन वेळेवर रद्द करण्याची पाळी का येत असावे बरं? याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. परीक्षेची तयारी करण्यासाठी किती मेहनत आणि नियोजन करावे लागते? याचा कोणी विचारच करत नाही.
जर प्रत्येकवेळी असाच गोंधळ होणार असेल तर, एक मार्गी द्याना सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्यायला! विद्यार्थ्यांची मागणी असताना ती का डावलली जात आहे? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा हा कोणी राजकीय घरातील व्यक्ती नसतोच, तर तो असतो सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य ! प्रत्येकवेळी आपण कशाप्रकारे मानसिक, आर्थिक खच्चीकरण करत असतात? अजून किती अग्नीदिव्य आमच्या बांधवांना पार पाडावे लागणार? आमच्या भावना कोण समजून घेणार?
त्या परिक्षार्थींच्या जागी स्वत:ची कल्पना करून पाहा!
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ते संवेदनशीलतनेने अडचणी सांगत आहेत. जर परीक्षा घेतली असती आणि नंतर फुटल्याचे कळले असते तर परिक्षार्थींवर अन्याय झाला असता. नंतर त्यांनी परिक्षार्थींची माफीही मागितली. त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे अनेकांनी कौतुकही केले आहे. पण त्याचवेळी काही प्रश्नही विचारले आहेत.
पेपर फुटल्याचे परिक्षेनंतर कळले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती, पण आता तरी वेगळं काय झालंय? गृहखाते तुमचेच. तरीही अशा पेपर फोडण्यांच्या टोळ्या कशा काय फोफावतात? कशी काय त्यांना पेपर फोडण्याची हिंमत होते. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना धन्यवाद दिले ते योग्यच! पण हे चित्रपटासारखे गुन्हा घडल्यावर पंचनामा करणेही आता बस झाले. मुळात पेपर असा सेट करूच नये की कुणालाही सहजतेने फोडता यावा.
पेपरफोड्यांना मोक्काखाली देशद्रोह्यांसारखी कारवाई करा!
आजवर बिहार-यूपीतून पेपर सॉल्व्हर, पेपर फोड्या टोळ्यांचे ऐकायचो. गेली काही वर्षे महाराष्ट्रात आता तेच सुरु झाले आहे. जी मुले लाखो रुपये देऊन पेपर मिळवत असतील ती मुले सेवेत आल्यावर गुंतवलेले लाखो वसूल करण्यासाठी कोट्यवधी वसूल करतीलच करतील. एक नवी अनर्थव्यवस्था आपण उभी राहू द्यायची की नाही ते आता सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवावे. पेपर फोडणे हा आता मोक्का अंतर्गत गुन्हा ठरवावा. अशा टोळक्यांना देशद्रोह्यांसारखीच वागणूक द्यावी. तीव्र वाटेल पण परिक्षार्थी सामान्य मुलांचे हाल पाहून भावना अनावर होतातच होतात.
आव्हाड स्वत: बोलले, एक टोळी सर्वच पेपर फोडतेय. असेलही तसे. पण ते तर अधिकच गंभीर. अशांना अद्दल घडवाच. मग ते कोणीही असोत. आता पेपर फोडीच्या घातपाताला माफी नाही म्हणजे नाहीच!
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’चे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com