तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी मनसेनं एक टिझर लाँच केला होता. त्यातील “सध्या वारं खूप सुटलय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे” हे विधान ठाण्याच्या सभेसाठी तयार केलेल्या टिझरसाठीही वापरण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात सध्या सुटलेलं वारं हे मनसेचंच आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. अर्थात याचा अर्थ मनसेसाठी राजकीयदृष्ट्या हे वारं सत्तेचं आहे, असं जरी नसलं तरी एक नक्की झालं, कोणत्याही राजकीय चर्चेत केंद्रस्थानी नसलेली मनसे आता सतत चर्चेत आली आहे. त्याअर्थानं सध्याचं वारं हे मनसेचंच आहे.
त्यामुळे आघाडीतील काही पक्ष त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला आक्रस्ताळा म्हणता येईल असा विरोध करताना दिसत आहे. आमदार अमोल मतकरी राज ठाकरेंना खाज ठाकरे म्हणालेत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अर्धवटराव म्हणालेत. हा आक्रस्ताळेपणा कोणाला लाभणार , कोणाला बाधणार हे मांडत मनसेसाठी राष्ट्रवादीची ही आक्रस्ताळी रणनीती बुस्टर डोसचं काम तर करणार नाही, याचा सरळस्पष्ट वेध घेण्याचा हा प्रयत्न:
मनसेंचं जोरदार ब्रँडिंग
कोणताही टीव्ही चॅनल लावला तरी त्यावर राज ठाकरेंच्या मनसेच्याच बातम्या दिसतात. त्या त्यांच्याबाजूने असतात किंवा विरोधातील असतात. पण असतातच असतात. त्यामुळे मनसे चर्चेत राहतं. राज ठाकरेंची विधानं सातत्यानं लोकांच्या कानावर पडत राहतात. मार्केटिंगमधील ब्रँडिंग करणाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात, सातत्यानं असं हॅमर करणं, आदळत ठेवणं हे कोणत्याही ब्रँडला जनमानसात ठसवण्यासाठी उपयोगी ठरत. त्याने फायदाच होतो.
राष्ट्रवादीकडून मनसेविरोधाचा अतिरेक?
राजकीय नेते हे कोणत्याही मार्केटिंग गुरुपेक्षाही जास्त धुर्त असतात. त्यांना ब्रँडिंगचं महत्व जास्त चांगलं कळतं. त्यामुळेच सध्या मनसेवर सत्ताधारी आघाडी त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने एक कलमी कार्यक्रम असल्यासारखे तुटून पडली आहे ते आश्चर्यकारक वाटते. खरंतर अशा चुका शिवसेना करत आली आहे. विरोध करत विरोधकांना मोठं करण्याची ती चूक यावेळी शिवसेना एका मर्यादेबाहेर करताना दिसत नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र मनसेविरोधाचा अतिरेक होत आहे.
विरोधच नसावा असंही नाही!
राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विरोधच करु नये, असं नाही. तसं केलं नाही तर राजकारण होणार कसं? पण तो विरोध अनाठायी वाटू नये. मनसेवर, राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा राग असणं स्वाभाविकच. एक काळ होता जेव्हा राज ठाकरे शरद पवारांच्याही प्रेमात पडले होते. तेव्हाच त्यांनी शोध मराठी मनाचा घेताना शरद पवारांना बोलतं करण्याचीही भूमिका बजावली होती. तसं त्यांनी ते रायगड मुक्कामी बाबासाहेब पुरंदरेंसाठीही केलं होतं. तरीही पवारांविषयीचा त्यांना मधल्या काळात आपुलकी होती, हे नाकारता येणार नाही.
उघडं पाडणारी टीका गैर नाही!
राज ठाकरेंनी २०१९मध्ये लाव रे तो व्हिडीओची कल्पना लढवत मोदी-शाहांना उघडं पाडलं होतं. आता त्याच कल्पनेतून आघाडी समर्थक राज ठाकरेंची पूर्वीची भूमिका आणि आताची भूमिका असा विरोधाभास मांडताना दिसतात. ते आवश्यकच. त्यातून राज ठाकरेंच्या मी जे बोललो ते बोललो…या भूमिकेला, विश्वसनीयतेला तडा जात राहिल. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांचं हे ट्विटही बोलके आहे.
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते.
सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?🤔 pic.twitter.com/lrJFhyle9o— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 18, 2022
राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तरासाठी शरद पवारांनी एवढा वेळ देणं धक्कादायक!
पण कधी कधी अतिप्रितीनंतर कमालीची कटुता येतं तसं झालं. सध्या राज ठाकरे हे भाजपाच्या नेत्यांसारखंच शरद पवारांना महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं संकट मानतात. त्यांच्या नव्या भाषणांमध्ये महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण हे शरद पवारांमुळेच सुरु झालं, असा आरोप करतात. तसं ते वारंवार करतात. मनसेच्या स्थापनेनंतर त्यांच्या प्रेमात पडलेली ब्राह्मण मतं पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी ते तसं करत असतीलही. आघाडीविरोधातील हिंदुत्ववादी भूमिकेतून त्यांनी भाजपाप्रमाणे पवारांनाच लक्ष्य करणं समजून घेता येतं. पण धक्कादायक वाटलं ते कोल्हापुरात शरद पवारांनी त्यांचे आरोप खोडून टाकण्यासाठी दिलेलं उत्तर.
राजू शेट्टींचं मोठं प्रमाणपत्र!
शरद पवार यांनीच ते दिलं पाहिजे होतं, असं वाटत नाही. आता आघाडीच्या विरोधात गेलेले शेतकरी नेते राजू शेट्टीही बोललेत, “शरद पवारांच्या राजकीय भूमिकांना विरोध आहे, पण ते जातीयवादी आहेत, असं बोलणार नाही.” खरंतर राजू शेट्टींसारख्या शेतकरी नेता हा आपला कसा नाही, वेगळ्या जातीधर्माचा कसा, हे निवडणूक काळातही पसरवलं गेलं होतं, तरीही शेट्टी पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप करत नाहीत, हे महत्वाचं. तसंच राष्ट्रवादीच्या भुजबळ, आव्हाड, मुंडे, मिटकरी या आणि अन्य नेत्यांनी एकदा स्वत:चा केसस्टडी मांडत एकदा उत्तर देत विषय संपवला असता तर पुरेसं होतं. पण इतरवेळी अनेकांना अनुल्लेखानं संपवण्यासाठी ओळखले जाणारे शरद पवार यावेळी मात्र स्वत: राज ठाकरेंच्या त्या आरोपावर बोलले.
सध्या राष्ट्रवादी फक्त राज ठाकरेंविरोधात!
शरद पवार बोललेच पण सध्या त्यांचे सर्वच नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोलत आहेत. केवळ बोलले असते तरी समजू शकलो असतो. पण कुणी खाज ठाकरे म्हणतं, कुणी अर्धवटराव म्हणतं तर कुणी आणखी काय म्हणतं. राज ठाकरे त्यांच्या भाषणात नकला करतात. नव्हे त्यांचं अर्ध भाषण हे त्यानेच भरलेलं असतं. पण त्यामुळे गर्दी जमत असली, टाळ्या मिळत असल्या तरी ते वाजवणारे हात मतदानाच्यावेळी ईव्हीएमवरील इंजिनाचं बटन दाबायला पुढे जात नसतात. ते भलतीकडेच वळतात. त्यामुळे राज ठाकरे करतात म्हणून आपणही तसंच करायचं, ही राष्ट्रवादीची रणनीती असेल तर भाजपा करते म्हणून आपणही ट्रोलिंगची ऑनलाइन झुंडगिरी करायची आणि ती योग्य म्हणवत, त्या व्हर्च्युअल सुखात दंग व्हायचं तसंच ते आहे. काही नाठाळांना उत्तर देण्यासाठी तेवढ्यापुरतं ते ठिक असतं पण कायम तसं करणं म्हणजे नुकसान करुन घेण्यासारखंच!
इतिहासाची पुनरावृत्ती!
तसंच राज ठाकरेंच्या सभा, कार्यक्रम यांच्याविषयी. मनसे स्थापन झाली तेव्हा राज्यात आघाडी सत्तेत होती. शिवसेना नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादी. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. मनसेच्या इंजिनाला कोळसा पुरवत त्यांनीही गती दिली. त्यातून सत्ता राखली असं म्हणतात. त्यावेळी एक घडायचं. मनसेच्या सभेची घोषणा होत असे. मग परवानगी मिळत नाही, अशा बातम्या येत असत. माध्यमांमध्ये मोठ्या बातम्या सुरु होत. मनसेचे नेते आवेशात बोलत. पण सभा मात्र ठरल्याप्रमाणे होत असत. वातावरण निर्मितीचा फायदा मात्र मनसेला होत असे. आताही तसंच घडतना दिसत आहे.
बीजेपीची एनसीपीछाप नक्कल?
मनसे हा एक राजकीय पक्ष आहे. तुम्हाला पटो न पटो. त्यांना सभा, आंदोलनं, कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला मान्य असो नसो, परवानगी द्यावीच लागणार. ठाण्यासारखं थोडं पुढे मागे होईल. एवढंच. मग उगाच त्यावर मोठमोठी विधानं का करता? अशा विरोधासाठीच्या विरोधामुळे साध्य काय होणार? त्यांच्यात बळ असेल, लोकांचा प्रतिसाद असेल तर ते वाढतील, लोकांच्या प्रतिसादाच्या वाफा नसतील तर इंजिन थकून मंदावेल. त्यांच्यावर राजकीय टीका करा. पण जिथं आवश्यक तिथं. भाजपाचे प्रवक्ते पाळी लावल्यासारखे एखाद्या मुद्द्यावर बोलतात. तशीच ही बीजेपीची एनसीपीछाप नक्कल असेल तर ठिक. मग काही बोलायलाच नको. पण भाजपा एखाद्या व्यक्तीला मुद्दे काढून लक्ष्य करते. सध्या राज ठाकरेंना खाज ठाकरे, अर्धवटराव म्हणणं म्हणजे त्यांच्या समर्थकांना चेतवण्यासारखंच होईल.
प्रत्येकाला पप्पू करता येत नसतं!
अनेकदा एखाद्या राजकीय नेत्याला हिणवून, नको ते शब्द वापरून कमी लेखायचं. चेष्टेचा विषय बनवायचं, अशीही रणनीती असते. त्यासाठी दुसऱ्या फळीतील, तिसऱ्या फळीतील नेत्यांना मोकळं सोडलं जातं. वाट्टेल ते बोलू दिलं जातं. भाजपाने राहुल गांधींच्या बाबतीत पप्पू प्रयोग केल्यापासून हा फॉर्म्युला अनेकांना भावतो. पण तसं नेहमीच आणि प्रत्येकाच्याबाबतीत घडतंच असं नाही. पुन्हा ते प्रस्थापित नेत्याच्याबाबतीत घडेलच असं नाही. उद्योन्मुख राहुल गांधींच्याबाबतीत जेवढं भाजपाला ते करता आलं ते आदित्य ठाकरेंच्याबाबतीत जमलं नाही. त्यामुळेच त्या धोरणानुसारही राज ठाकरेंना नको त्या भाषेत, शब्दात लक्ष्य करून फायदा होईलच असं नाही. उलट ही रणनीती उलटूही शकते.
अर्थात कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यातही पुन्हा एक ठरवलेल्या रणनीतीनुसार असेल तरीही त्यांचा हक्क. पण ही रणनीती अंगाशीही येवू शकते. अनेकदा एखाद्याच्या न पटणाऱ्या आक्रस्ताळ्या वागण्याला केलेला आक्रस्ताळा विरोध हा त्याच्यासाठी बुस्टर डोस ठरु शकतो. पत्रकारांपेक्षा राजकाऱण हे राजकीय नेत्यांना जास्त चांगलं कळतं. त्यामुळे मी जास्त काय बोलणार?
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)